मुंबईतील सात विभागांमध्ये रुग्णवाढ पाच टक्क्यांहून अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 01:00 AM2020-06-04T01:00:55+5:302020-06-04T01:01:35+5:30
वरळी, धारावीचा धोका झाला कमी : घाटकोपर, दहिसरची चिंता वाढली
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांची दररोज होणारी सरासरी वाढ आता ३.६४ टक्के एवढी आहे. मुंबईतील कोरोना हॉटस्पॉट बनलेल्या वरळी, धारावी या विभागांमध्ये रुग्णवाढ आता केवळ दोन टक्के आहे. मात्र घाटकोपर, मालाड, कांदिवली, बोरीवली, दहिसर, भांडुप आणि मुलुंड या मुंबईतील सात विभागांमध्ये अद्यापही दररोजची रुग्णवाढ पाच टक्क्यांहून अधिक असल्याचे समोर आले आहे.
मुंबईत आतापर्यंत ४१ हजार ९८६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र यापैकी १७ हजार १८७ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असल्याने आता केवळ २२ हजार ५१४ रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचे प्रमाण एप्रिल महिन्यात सात दिवसांवर आले होते. हे प्रमाण २० दिवसांवर आणण्यासाठी पालिका प्रशासनाने आठ सनदी अधिकाऱ्यांची टीम ८ मेपासून नियुक्त केली आहे. या प्रयत्नांमुळे रुग्ण दुप्पट होण्याची संख्या आता १६ दिवसांवर आल्याचा दावा प्रशासन करीत आहे.
आता मुंबईतील २४ प्रशासकीय विभागांपैकी जवळपास १७ विभागांमध्ये रुग्ण दररोज वाढण्याचे प्रमाण दोन ते तीन टक्के असल्याचे आढळून आले आहे. दोन हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झालेल्या विभागांमध्ये आता रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी जाण्याचे प्रमाण अधिक आहे.
मात्र पश्चिम उपनगरात मालाड ते दहिसर आणि पूर्व उपनगरात घाटकोपर, भांडुप, मुलुंड या परिसरात रुग्ण वाढण्याचे प्रमाण सरासरीहून अधिक आहे.
सरासरीपेक्षा अधिक रुग्ण असलेले विभाग
मुंबईत आतापर्यंत ४१ हजार ९८६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी १७ हजार १८७ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. आता २२ हजार ५१४ रुग्ण उपचार घेत आहेत.