रेती भरलेले सात डंपर पकडले
By admin | Published: December 2, 2014 10:51 PM2014-12-02T22:51:00+5:302014-12-02T22:51:41+5:30
पेण मार्गावरील पेझारी येथील रायगड पोलिसांच्या सशस्त्र पोलीस चेकपोस्टवरुन अलिबागच्या दिशेने रवाना झालेल्या रेतीची बेकायदा वाहतूक करणारे सहा डंपर
अलिबाग : पेण मार्गावरील पेझारी येथील रायगड पोलिसांच्या सशस्त्र पोलीस चेकपोस्टवरुन अलिबागच्या दिशेने रवाना झालेल्या रेतीची बेकायदा वाहतूक करणारे सहा डंपर अलिबागजवळच्या कार्लेखिंड बस स्टॉपजवळ रंगेहाथ पकडण्यात आले. अलिबाग तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार मिलिंद मुंढे यांच्या नेतृत्वाखालील पथकाला मंगळवारी पहाटेला यश आले.
या डंपरचालकांना पोयनाड पोलीस ठाण्यात नेताना आणखी तीन बेकायदा रेतीवाहू डंपर्स पेझारी पोलीस चेकपोस्ट येथेच सकाळी ६.२० वाजता रंगेहाथ पकडण्यात नायब तहसीलदार मुंढे यांना यश आले. परंतु त्यातील दोन डंपर्स गडबडीचा फायदा घेवून अलिबागच्या दिशेने फरार झाले. महसूल विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडलेल्या या रेतीवाहू डंपर्समुळे रायगड पोलिसांचे पेझारी पोलीस चेक पोस्ट नेमके काय काम करते याबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पोयनाड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन ओम शिवदास तांदळे (रा. पळी), अस्सन दस्तगीर पटेल ( रा.थळ, वायशेत), कादर मेहबुब शिपाई (रा. मोर्बा), अशोक सुख जाधव (रा. माणगाव), कमलेश कुमार सिंग, (राऊत हॉस्पिटलजवळ, माणगाव) आणि एमएच-०६-एक्यु-६८२५ चा चालक अहमदअली या सहा जणांना अटक करण्यात आली आहे. एकूण ७ डंपर्स, २१ ब्रास रेती असा १५ लाख ८१ हजार ९८६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.