बाजाररहाटाचे सात-अकरा आणि कोरोनाच्या जाणिवेचे तीन-तेरा...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:06 AM2021-04-25T04:06:52+5:302021-04-25T04:06:52+5:30
राज चिंचणकर लोकमत न्यूज नेटवर्क नवीन निर्बंधांनुसार दुकाने उघडी ठेवण्यासाठी; तसेच भाजीपाला आणि तत्सम गोष्टींच्या खरेदी-विक्रीसाठी सकाळी ७ ते ...
राज चिंचणकर
लोकमत न्यूज नेटवर्क
नवीन निर्बंधांनुसार दुकाने उघडी ठेवण्यासाठी; तसेच भाजीपाला आणि तत्सम गोष्टींच्या खरेदी-विक्रीसाठी सकाळी ७ ते ११ ही वेळ सध्या ठरवून देण्यात आली आहे. परिणामी, या चार तासांच्या अवधीत नागरिकांची बाजारात मोठी झुंबड उडालेली दिसून येत आहे. वास्तविक सकाळी ७ ते ११ अशी जरी बाजारहाटाची वेळ असली, तरी अगदी सकाळच्या सुमारास नागरिक घराबाहेर पडून बाजारात जाण्याची शक्यता कमी असल्याने, खरेदीचा हा सगळा भार प्रामुख्याने नंतरच्या दोन तासांत म्हणजेच सकाळी ९ ते ११ या वेळेवर येऊन पडला आहे. या वेळेत बाजारहाट जोरात सुरू असला, तरी कोरोना संकटाच्या जाणिवेचे मात्र तीन-तेरा वाजत असल्याचे चित्र आहे.
संपूर्ण दिवसाच्या खरेदीसाठी नागरिक प्रामुख्याने ९ ते ११ या वेळेत मोठ्या संख्येने बाजारात खरेदीसाठी उतरलेले दिसून येत आहेत. साहजिकच, या दोन तासांत जवळपास सर्वच दुकानांसमोर भल्यामोठ्या रांगा पाहायला मिळत आहेत. गेल्यावर्षीच्या लॉकडाऊनच्या काळात दुकानांसमोर वर्तुळे आखून, नागरिक सामाजिक अंतर कसे पाळतील याकडे लक्ष दिले गेले होते. पण यावेळी मात्र दुकानांसमोर अशी वर्तुळे केवळ अपवादात्मकरित्या दिसून येत आहेत. परिणामी, यावेळी दुकानांसमोर लागलेल्या रांगांमध्ये सामाजिक अंतराचा फज्जा उडाल्याचे स्पष्ट होत आहे.
केवळ दोन-चार तासांमध्ये खरेदी उरकायची असल्याने नागरिकांची दुकानांसमोर प्रचंड घाई सुरू आहे.
लवकरात लवकर आपल्या हाती जिन्नस पडावेत, यासाठी नागरिकांमध्ये मोठी अहमहमिका लागलेली दिसते. या सगळ्यात सामाजिक अंतराचे मात्र बारा वाजलेले दिसून येत आहेत. पण एकूणच, हातावर पोट असणारे विक्रेते आणि मर्यादित वेळेत खरेदी करणारे सर्वसामान्य नागरिक अशा या दोन बाजू आहेत. सध्याच्या आर्थिक विवंचनेच्या काळात दोन पैसे गाठीला अधिक बांधावेत म्हणून विक्रेतेही त्यांच्याकडील वस्तूंची जोमाने विक्री करताना दिसून येत आहेत.
एकीकडे कोरोनाचे संकट वाढत असल्याचे चित्र असताना, नागरिकांची बाजारांमध्ये होणारी गर्दी हा चिंतेचा विषय बनला आहे. मात्र कोरोनाचे संकट असले, तरी दैनंदिन गरजेच्या वस्तू घेण्यासाठी नागरिकांना बाजारात जाणे क्रमप्राप्त ठरत असल्याचेही स्पष्ट होत आहे. असे असले, तरी बाजारात उतरल्यावर मात्र नागरिकांना कोरोनाच्या प्रादुर्भावाचा पूर्णतः विसर पडल्याचे दिसून येत आहे आणि ही गोष्ट चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर, बाजारहाट करताना नागरिकांनी कोरोनाच्या संकटाची जाणीव ठेवायलाच हवी, असा सूर जागरूक नागरिकांमधून उमटत आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------