महायुतीतर्फे मुंबईत सात, तर मविआ देणार तीन महिला; शरद पवार गटातून कुणीही नाही?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 06:13 AM2024-10-22T06:13:38+5:302024-10-22T06:14:53+5:30

मविआकडून सक्षम महिला उमेदवारांचा शोध घेण्यात येत आहे.

Seven female candidates in Mumbai by Mahayuti probably three by MVA but No one from Sharad Pawar group | महायुतीतर्फे मुंबईत सात, तर मविआ देणार तीन महिला; शरद पवार गटातून कुणीही नाही?

महायुतीतर्फे मुंबईत सात, तर मविआ देणार तीन महिला; शरद पवार गटातून कुणीही नाही?

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महायुतीमधील भाजप, शिंदेसेना आणि अजितदादा गटाच्या तुलनेत महाविकास आघाडीकडे महिला उमेदवार नाहीत. विधानसभेसाठी भाजपने २ महिला उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. आणखी ५ महिलांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर, मविआकडून केवळ २ महिला उमेदवार असतील. त्यामुळे मविआकडून सक्षम महिला उमेदवारांचा शोध घेण्यात येत आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतून ६ महिला आमदार निवडून आल्या होत्या. त्यांत भाजपच्या मनीषा चौधरी (दहिसर), विद्या ठाकूर (गोरेगाव), भारती लव्हेकर (वर्सोवा), शिंदेसेनेच्या यामिनी जाधव (भायखळा), उद्धवसेनेच्या ऋतुजा लटके (अंधेरी) काँग्रेसच्या वर्षा गायकवाड (धारावी) यांचा समावेश होता.

महायुतीमधील भाजपने पहिल्या यादीत मुंबईतील मनीषा चौधरी आणि विद्या ठाकूर यांची नावे जाहीर केली आहेत. तर, भारती लव्हेकर, जोगेश्वरीमधून इच्छुक उज्ज्वला मोडक वेटिंग लिस्टवर आहेत. शिंदेसेनेचे खासदार वायकर यांनी पत्नीसाठी जोगेश्वरीची जागा मागितली आहे. भायखळ्यामधून यामिनी जाधव यांना पुन्हा संधी मिळेल. अजितदादा गटानेही अणुशक्ती नगरमधून सना मलिक यांचे नाव निश्चित केल्याचे समजते.

शरद पवार गटातून कुणीही नाही

मविआमधून गेल्यावेळी उद्धवसेनेच्या ऋतुजा लटके (अंधेरी) आणि काँग्रेसच्या वर्षा गायकवाड (धारावी) निवडून आल्या होत्या. मात्र, गायकवाड लोकसभेत निवडून गेल्या आहेत. यावेळी काँग्रेसच्या अजंता यादव (कांदिवली), उद्धवसेनेच्या ऋतुजा लटके (अंधेरी), श्रद्धा जाधव (वडाळा) यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. तर, शरद पवार गटाकडून मात्र मुंबईत कुणीही महिला उमेदवार नसेल. त्यामुळे महायुतीच्या तुलनेत मविआला महिला उमेदवारांची शोधाशोध करावी लागणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Seven female candidates in Mumbai by Mahayuti probably three by MVA but No one from Sharad Pawar group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.