सेव्हन हिल्स परदेशी कंपनीच्या ताब्यात?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 01:05 AM2018-12-15T01:05:52+5:302018-12-15T01:08:41+5:30
सर्वपक्षीय नगरसेवकांचा विरोध
मुंबई : सार्वजनिक-खाजगी तत्त्वावर मरोळ येथील रुग्णालय सेव्हन हिल्स व्यवस्थापनाला चालविण्यास देण्याचा प्रयोग फसल्यानंतर महापालिकेने आता दुबईमधील एका कंपनीबरोबर करार करण्याची तयारी केली आहे. यासाठी पालिका नियमांनुसार सुधार आणि महासभेची मंजुरी आवश्यक आहे. त्यानुसार खाजगी संस्थांना रुग्णालय चालविण्यासाठी देण्याबाबत फेरविचार करण्याचा ठराव पालिका महासभेत शुक्रवारी एकमताने मंजूर करण्यात आला. यामुळे प्रशासन विरुद्ध लोकप्रतिनिधी असा सामना रंगणार आहे.
अंधेरी पूर्व, मरोळ येथील कर्करोगाचे रुग्णालय बंद पडल्यानंतर महापालिकेने त्या ठिकाणी मोठे रुग्णालय बांधून सेव्हन हिल्स व्यवस्थापनाला चालविण्यासाठी दिले. मात्र नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महापालिका आणि संबंधित रुग्णालय व्यवस्थापनाबरोबर वाद निर्माण झाला. महापालिकेचे १२३ कोटी रुपये थकविल्यामुळे प्रशासनाने हे रुग्णालय चालविण्यासाठी नव्याने निविदा मागविल्या. यामध्ये अबुदाबीमधील कंपनीने सर्व थकीत देणी फेडून रुग्णालय चालविण्यास इच्छा दर्शविली आहे.
मात्र शिवसेना नगरसेविका राजुल पटेल यांनी हे रुग्णालय मक्त्याने देण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे पालिका महासभेत आज केली. मात्र हे रुग्णालय परस्पर अन्य कंपनीकडे सोपविण्याचा निर्णय झाल्याचे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी निदर्शनास आणले. हा भूखंड खाजगी संस्थेला रुग्णालयासाठी दिल्यापासून वादाच्या भोवऱ्यात आहे.
३० वर्षांचा करार
सन २००५ मध्ये महापालिकेने ७० हजार चौ.मी.चा अंधेरी येथील भूखंड सेव्हन हिल्स हेल्थ केअरला दिला.
दीड हजार खाटा असलेले हे रुग्णालय ३० वर्षांच्या करारावर सार्वजनिक-खाजगी तत्त्वावर महापालिकेने संबंधित कंपनीला दिले होते.
मात्र २० टक्के गरीब रुग्णांना मोफत उपचार देण्याच्या अटीचे रुग्णालय व्यवस्थापनाने पालन केले नाही. त्यामुळे हे रुग्णालय खाजगी कंपनीला चालविण्यास देण्याचे उद्दिष्टच असफल झाले होते.