सेव्हन हिल्स हॉस्पिटल  पालिकेने ताब्यात घ्यावे; मुख्यमंत्री शिंदेंकडे काँग्रेसची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 01:22 PM2023-09-27T13:22:11+5:302023-09-27T13:22:33+5:30

अंधेरी (पूर्व) मरोळ येथील अत्याधुनिक सेव्हन हिल्स हॉस्पिटल आरोग्य सेवेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.

Seven Hills Hospital to be taken over by the Municipality Congress demands from Chief Minister Shinde | सेव्हन हिल्स हॉस्पिटल  पालिकेने ताब्यात घ्यावे; मुख्यमंत्री शिंदेंकडे काँग्रेसची मागणी

सेव्हन हिल्स हॉस्पिटल  पालिकेने ताब्यात घ्यावे; मुख्यमंत्री शिंदेंकडे काँग्रेसची मागणी

googlenewsNext

मुंबई :  

अंधेरी (पूर्व) मरोळ येथील अत्याधुनिक सेव्हन हिल्स हॉस्पिटल आरोग्य सेवेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. शहराच्या मोक्याच्या जागी १६ एकर जागेवर असलेल्या १५०० खाटांच्या या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा आहेत.  हॉस्पिटल सध्या दिवाळखोरीत निघाल्याने ते ताब्यात घेऊन ‘एम्स’सारखे हॉस्पिटल येथे सुरू करता येणे शक्य आहे. मुंबई व महाराष्ट्राच्या जनतेला उत्तम आरोग्य सेवा पुरविण्यासाठी हे हॉस्पिटल महत्त्वाची भूमिका बजावू शकते. खासगी कंपनीच्या घशात हे हॉस्पिटल घालण्याऐवजी मुंबई महापालिकेनेच ते ताब्यात घ्यावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुंबईचे माजी उपमहापौर राजेश शर्मा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केली आहे.

मुंबई पालिका आणि राज्य सरकारने सार्वजनिक गरजा लक्षात घेऊन व्यापक दृष्टीकोन ठेवण्याची गरज आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉस्पिटल म्हणून विकसित करण्याचा विचार करणे आवश्यक आहे. सेव्हन हिल्स हॉस्पिटलच्या आवारात शिल्लक असलेल्या जागेवर मेडिकल व नर्सिंग कॉलेज सुरू करता येऊ शकते.

सेव्हन हिल्स हॉस्पिटलच्या जागेचा मूळ मालकी हक्क मुंबई महानगरपालिकेचा आहे. महानगरपालिकेने ही जागा सेव्हन हिल्स हॉस्पिटलला लीजवर दिलेली आहे. मुंबई महापालिकेने दुसऱ्या कोणत्याही खासगी कंपनीच्या ताब्यात ती जागा जाऊ न देता स्वतः ताब्यात घेतली, तर मुंबईमध्ये एक प्रशस्त, अत्याधुनिक, सर्व सोयींनी युक्त असे महत्त्वाचे आरोग्य केंद्र बनू शकते.

अशी सुविधा पुन्हा शक्य नाही
  अंधेरीतील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या हॉस्पिटलची बाजारभावानुसार ३००० ते ४००० कोटी रुपये किंमत आहे; पण, या जागेकडे व्यापारी दृष्टीकोनातून न पाहता मानवी दृष्टीकोनातून त्याकडे पाहिले पाहिजे. 
  याच हॉस्पिटलमध्ये कोरोना महामारीच्या काळात सुसज्ज कोविड सेंटर उभे केले होते, ज्याचा मुंबईकरांना मोठा फायदा झाला होता. 

Web Title: Seven Hills Hospital to be taken over by the Municipality Congress demands from Chief Minister Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.