Join us

कोरोनाशी लढा देण्यासाठी सेव्हन हिल्स सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 4:14 AM

महापौरांनी घेतला आढावालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या उपनगरात विशेषतः अंधेरी, जोगेश्वरी, कांदिवली, बोरिवली या भागात ...

महापौरांनी घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या उपनगरात विशेषतः अंधेरी, जोगेश्वरी, कांदिवली, बोरिवली या भागात वाढत आहे. त्यामुळे अंधेरी, मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालय पुन्हा एकदा कोरोना रुग्णांसाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. रुग्णालयात सुरू असलेल्या पूर्वतयारीचा महापौर किशोरी पेडणेकर यांनी शुक्रवारी आढावा घेतला.

मुंबईतील बाधितरुग्णांच्या संख्येत सरासरी ०.१७ टक्के दैनंदिन वाढ दिसून येत आहे. १ फेब्रुवारीपासून लोकल सेवा सर्वांसाठी ठराविक वेळेत सुरू करण्यात आल्यानंतर मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा वाढू लागला आहे. जानेवारीअखेरीस दररोज तीनशेपर्यंत रुग्ण सापडत होते. हीच संख्या आता ७५०वर पोहोचली आहे. संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न सुरू असून, जम्‍बो सेंटर्स आणि कोरोना काळजी केंद्रेही पुन्हा सुरू करण्यात येत आहेत.

प्रत्‍येक विभाग कार्यालयाच्‍या हद्दीत हाय रिस्‍क कॉन्‍टॅक्‍ट व्‍यक्तींसाठी कोरोना काळजी केंद्र १ आणि लक्षणे नसलेल्‍या बाधितांसाठी कोरोना काळजी केंद्र २ असे प्रत्‍येकी किमान एक केंद्र सुरू ठेवण्यात येणार आहे. तसेच जम्‍बो सेंटर्समधील खाटांच्या क्षमतांचा आढावा घेण्यात येत आहे. नियमित खाटा, ऑक्सिजन खाटांची कमतरता भासणार नाही, याची काळजी घेण्याची सूचनाही महापौरांनी केली. सेव्हन हिल्स रुग्णालयात पश्चिम उपनगरातील रुग्ण मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे येथील यंत्रणा कितपत सज्ज आहेत, याचा आढावा महापौरांनी घेतला.

* रुग्णालयांची माहिती मिळणार प्रत्येक तासाला

मुंबईतील सर्व खासगी व महापालिका रुग्णालयातील कोविड रुग्‍ण, रुग्‍णशय्या व इतर आवश्‍यक माहिती दर तासाने संकलित केली जाणार आहे. ही माहिती डॅशबोर्डच्‍या माध्‍यमातून आपत्‍कालीन व्‍यवस्‍थापन खात्‍याने अद्ययावत करून दर तासाला द्यावी, असे निर्देश महापौरांनी दिले.