सात बिबट्यांना पालक मिळाले; वन्यजीवांना पालक मिळेना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2019 01:59 AM2019-12-08T01:59:24+5:302019-12-08T02:01:05+5:30
बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात गेल्या सात वर्षांपासून ‘वन्यप्राणी दत्तक योजना’ राबविली जात आहे.
मुंबई : बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात गेल्या सात वर्षांपासून ‘वन्यप्राणी दत्तक योजना’ राबविली जात आहे. उद्यानात नऊ बिबटे असून आतापर्यंत सात बिबट्यांना दत्तक घेण्यात आले आहे. परंतु सिंह, वाघ, हरीण व नीलगाय इत्यादी प्राणी पालकत्वापासून वंचित आहेत. सध्या नागरिकांमध्ये हळूहळू वन्यप्राण्यांप्रति प्रेम, आपुलकी निर्माण होऊ लागली आहे.
वन्यप्राण्यांचा निसर्गातल्या अधिवासाची माहिती, देखभाल, शारीरिक व मानसिक स्वास्थ्य इत्यादी गोष्टी व्यक्तींना जवळून पाहायला मिळतात. त्यामुळे जास्तीतजास्त नागरिकांनी वन्यप्राणी दत्तक योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उद्यान प्रशासनाने केले आहे.
उद्यानातील रवींद्र व जेस्पा हे नर सिंह तसेच गोपा ही मादी यांना अद्याप पालक मिळालेले नाहीत. आनंद हा नर वाघ असून लक्ष्मी, बसंती, मस्तानी आणि बिजली या मादीही पालकांच्या शोधात आहेत. याशिवाय जॉन (नर) व हेमा (मादी) या बिबट्यांनाही पालकत्व मिळालेले नाही. नऊ वर्षांच्या अर्जुनला साधना वझे या गेल्या आठ वर्षांपासून दत्तक घेत आहेत. सात वर्षांचा नर रेग्युलसला पंकज मल्होत्रा, सहा वर्षांचा नर धुळे याला प्रसाद कापरे व प्रशांत कर्णिक, दीड वर्षाचा नर आतिशला सुमित राघवन, एक वर्षाचा नर सूर्याला जीत आठवले, एक वर्ष चार महिन्यांच्या मादी ताराला संदीप पाटील आणि आठ वर्षांच्या नर कोयनाला नुकतेच मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांनी मुलीच्या नावे दत्तक घेतले.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे (व्याघ्र व सिंह विहार) वनपरिक्षेत्र अधिकारी विजय बारब्दे म्हणाले, महाराष्ट्र शासनाने २०१३ सालापासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ‘वन्यप्राणी दत्तक योजना’ सुरू केली. बंदिवासात असलेल्या वन्यप्राण्यांबद्दल आपल्याला माहिती मिळावी. तसेच निसर्गातील त्यांचे जीवन कसे असते? शासन वन्यजीवांवर कसा खर्च करते? याशिवाय उद्यान प्रशासन वन्यप्राण्यांची देखभाल, शारीरिक व मानसिक स्वास्थ्य कसे राखते? या सर्व गोष्टींची जवळून ओळख व्हावी आणि आपले पर्यावरणाप्रति काहीतरी देणे आहे, अशी भावना जनमानसात रुजावी, हा मुख्य उद्देश वन्यप्राणी दत्तक योजनेचा आहे. उद्यानातील सिंह, वाघ, बिबट्या, हरीण आणि नीलगाय इत्यादी प्राणी दत्तक घेता येतात. वन्यप्राण्यांचा वर्षभराचा खर्च चेक स्वरूपात उद्यान प्रशासन स्वीकारते.
उद्यान प्रशासनाचे आवाहन
वन्यप्राण्यांचे जीवन, देखभाल व वैद्यकीय सेवा कशी पुरविली जाते, या गोष्टी जवळून पाहण्याची संधी संबंधित व्यक्तीला मिळते. जी सामान्य व्यक्तीला कधीच मिळत नाही. वन्यप्राण्यांना ज्यांनी दत्तक घेतले आहे त्यांना आठवड्यातून एकदा विनाशुल्क जवळून पाहण्याची संधी मिळते.