चीनमधील ‘ते’ सात महाराष्ट्रीयन विद्यार्थी लवकरच परतणार, भारतीय दूतावासाशी आरोग्य राज्यमंत्र्यांनी साधला संवाद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 05:35 AM2020-02-01T05:35:21+5:302020-02-01T05:36:20+5:30
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मदतीसाठी त्यांनी आवाहन केले असून यासंदर्भात त्यांनी पत्रव्यवहारही केला आहे.
मुंबई : चीनमधील हुआन शहरापासून ९० किलोमीटर अंतरावर सियानिग गावात हुबई विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठ असून तेथे भारतातील २७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर हे सर्व विद्यार्थी भारतात लवकरच परतणार असून तेथील भारतीय दूतावासाशी महाराष्ट्राचे आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी संवाद साधला. तसेच महाराष्टÑातील विद्यार्थ्यांना मदत करण्याचे आवाहन केले.
चीनमधील हुआन शहरात हुबई सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्रातील सलोनी त्रिभुवन, जयदीप देवकाते, आशिष गुरमे, प्राची भालेराव, भाग्यश्री ऊके महावती, सोनाली भोयर, कोमल जल्देवार हे भारतीय विद्यार्थी-विद्यार्थिनी अडकून पडले आहेत. त्यांना तातडीने आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी, भोजनाची व्यवस्था करावी व त्यांना तातडीने भारतात पाठवण्यासाठी सहकार्य करावे, यासाठी महाराष्ट्राचे आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी चीनमधील भारतीय दूतावासातील राजदूत विक्रम मिस्त्री व उपराजदूत बिगोल अकोणी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मदतीसाठी त्यांनी आवाहन केले असून यासंदर्भात त्यांनी पत्रव्यवहारही केला आहे.
सात विद्यार्थ्यांपैकी काहींशी तर काहींच्या नातेवाइकांशी राज्यमंत्र्यांनी संपर्क साधला. त्या वेळी विद्यार्थ्यांना या विषाणूशी लढण्यासाठी आवश्यक ९५ एन मास्कचा पुरवठा झाला नसल्याचे समोर आले. राज्यमंत्र्यांनी ही बाब तेथील दूतावासाच्या लक्षात आणून दिली असून त्यांना तत्काळ संबंधित सोयीचा पुरवठा करावा, असा पत्रव्यवहार केला आहे, असे त्यांनी सांगितले.
चायनाला असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सलोनी त्रिभुवन या विद्यार्थिनीचा समावेश असून तिच्या वडिलांशी संपर्क साधला असता ती सद्य:स्थितीत व्यवस्थित असून शनिवारी सकाळपर्यंत तिला दिल्ली विमानतळावर आणण्यात येईल, अशी माहिती त्यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच हुआनवरून येताना सुरुवातीला सर्व सात विद्यार्थ्यांची सुरक्षेच्या कारणास्तव वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.