सात महिन्यांत ३७ जणांनी केले अवयवदान
By admin | Published: July 27, 2016 02:44 AM2016-07-27T02:44:28+5:302016-07-27T02:44:28+5:30
‘मरावे परि अवयवरूपि उरावे’ याविषयी होत असलेल्या जनजागृतीचा फायदा गरजू रुग्णांना होत आहे. गेल्या वर्षी २०१५ मध्ये ४२ जणांनी अवयवदान केले होते. २०१६ मध्ये सात
मुंबई : ‘मरावे परि अवयवरूपि उरावे’ याविषयी होत असलेल्या जनजागृतीचा फायदा गरजू रुग्णांना होत आहे. गेल्या वर्षी २०१५ मध्ये ४२ जणांनी अवयवदान केले होते. २०१६ मध्ये सात महिन्यांत ३७ जणांनी अवयवदान करून १५२ जणांना जीवनदान दिले आहे. त्यामुळे २०१६ या वर्षात अवयवदानाचा नवा उच्चांक निश्चित होईल, अशी आशा या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
३७ अवयवदात्यांपैकी ८ अवयवदात्यांनी जुलै महिन्यात अवयवदान केले आहे. २५ जुलैच्या रात्री कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयातील एका ३५ वर्षीय पुरुषास ब्रेनडेड घोषित करण्यात आले. या पुरुषाचे यकृत दान करण्यात आले. या पुरुषाच्या यकृतामुळे दोघांना जीवनदान मिळाले आहे. यकृताचा एक भाग अंबानी रुग्णालयातील ३० वर्षीय महिलेला तर दुसरा भाग ज्युपिटर रुग्णालयातील ४६ वर्षीय पुरुषास देण्यात आला आहे.
मुंबईसह राज्यातही अवयवदानाविषयी जनजागृती वाढताना दिसत आहे. उर्वरित राज्यांत सात महिन्यांमध्ये ३५ जणांनी अवयवदान केले आहे. मुंबईत ६२ किडनी, ३५ यकृत आणि १८ हृदय दान करण्यात आले आहेत. मुंबईत होत असलेल्या अवयवदानामुळे अनेकांना जीवनदान मिळत आहे. ही सकारात्मक बाब आहे. पुढच्या पाच महिन्यांत याच वेगाने अवयवदान झाल्यास मुंबईत अवयवदानाचा नवीन उच्चांक प्रस्थापित होईल, असे विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)