सात नवीन वैद्यकीय महाविद्यालये, राज्यात वैद्यकीय शिक्षणाच्या जागा वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 06:33 AM2021-03-09T06:33:23+5:302021-03-09T06:33:51+5:30
या निर्णयामुळे राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रवेश क्षमतेत वाढ होणार असून स्थापन होणाऱ्या नवीन शासकीय महाविद्यालयांमुळे राज्यात पदवी स्तरावरील १ हजार ९९०, तर पदव्युत्तर स्तरावर १ हजार, आणि विशेषज्ञांच्या २०० जागा वाढणार आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, नाशिक, रायगड आणि सातारा, अमरावती व परभणी येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्यातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही खूशखबर आहे. असा निर्णय घेतला जाणार असल्याचे वृत्त सगळ्यात आधी ‘लोकमत’ने २३ डिसेंबर २०२० रोजी प्रकाशित केले होते.
या निर्णयामुळे राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रवेश क्षमतेत वाढ होणार असून स्थापन होणाऱ्या नवीन शासकीय महाविद्यालयांमुळे राज्यात पदवी स्तरावरील १ हजार ९९०, तर पदव्युत्तर स्तरावर १ हजार, आणि विशेषज्ञांच्या २०० जागा वाढणार आहेत. नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्याकरिता जमीन, पायाभूत सुविधा, बांधकाम, वित्त पुरवठा, संचालन व देखभाल यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता असते. नवीन वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्याकरिता त्यामुळे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सार्वजनिक-खासगी भागीदारीचे धोरण निश्चित करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
अभिमत विद्यापीठ दर्जा
ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई व बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांना अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्याचा राज्य शासनाचा मानस असल्याची घोषणाही पवार यांनी केली.