मुंबई : मुंबईतील पार्किंग समस्या दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत असताना महापालिकेने मेट्रो-३ प्रोजेक्टसाठी दक्षिण मुंबईतील जमिनीखालील ७ पार्किंग योजना गुंडाळल्या आहेत. मुंबईत आधीच पार्किंगच्या मोठ्या समस्या असून, त्यात नवे ७ प्रकल्प रद्द झाल्याने पार्किंगसाठी जागा उपलब्ध कुठे करून दिली जाणार याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. या महत्त्वाकांक्षी योजना गुंडाळल्याची माहिती अॅड. जोएल कार्लोस यांनी महापालिकेतर्फे मुख्य न्यायाधीश मोहित शहा व न्या. अनिल मेनन यांच्या खंडपीठासमोर दिली. महत्त्वाचे म्हणजे मेट्रो-३ आल्यानंतर दक्षिण मुंबईत येणाऱ्या वाहनांची संख्या कमी होईल; तसेच ही योजना तूर्तास परवडण्यासारखी नाही, असेही अॅड. कार्लोस यांनी न्यायालयासमोर स्पष्ट केले. यासोबतच पालिकेने ही योजना गुंडाळल्याचे समर्थन करणारे प्रतिज्ञापत्रही न्यायालयात सादर केले. पार्किंगची काळजी घेण्यास पालिका समर्थ आहे, असे पालिकेने प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.जमिनीखालील पार्किंगसाठी पालिकेने मेसर्स वेनू पार्किंग या कंपनीसोबत करार केला. या योजनेसाठी हुतात्मा चौक, मुंबई उच्च न्यायालय, रिगल सिनेमा व क्रॉफर्ड मार्केट या जागादेखील निश्चित करण्यात आल्या. मात्र, या करारानुसार पुढे काहीच कारवाई न झाल्याने या कंपनीने उच्च न्यायालयात याचिका केली. ही याचिका प्रलंबित असताना पालिकेने कंपनीला पत्र पाठवून ही योजनाच गुंडळाल्याचे कळवले. या महापालिकेच्या निर्णयालाही कंपनीने आव्हान दिले आहे.मुख्य न्यायाधीश मोहित शहा व न्या. अनिल मेनन यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. त्यात अॅड. कार्लोस यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने ही सुनावणी जानेवारी २०१६पर्यंत तहकूब केली.जमिनीखालील पार्किंगसाठी निश्चित केलेल्या जागेवर पार्किंगची समस्या गंभीर आहे. यापैकी क्रॉफर्ड मार्केट येथे तर वाहतुकीची प्रचंड कोंडी असते. तेथे सध्याच्या परिस्थितीत पार्किंग करणेही शक्य होत नाही. दहशतवादाचा धोका असल्याने उड्डाणपुलाखालील पार्किंग हायकोर्टाच्या आदेशानंतर बंद करण्यात आली आहे. तरीदेखील सध्या संपूर्ण जेजे उड्डाणपुलाखालील अवैध पार्किंग सुरूच आहे. त्यात महापालिकेने जमिनीखालील पार्किंग रद्द केल्याने भविष्यात पार्किंगची मोठी समस्या उद्भवणार आहे.
मेट्रो-३साठी सात पार्किंग प्रकल्प गुंडाळले
By admin | Published: July 25, 2015 2:17 AM