Join us

खंडणीप्रकरणी अश्विन नाईकसह सात जणांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 4:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : खंडणी मागितल्याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन अश्विन नाईक व अन्य सात जणांवर २०१५ मध्ये दादर पोलीस ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : खंडणी मागितल्याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन अश्विन नाईक व अन्य सात जणांवर २०१५ मध्ये दादर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. याप्रकरणी विशेष न्यायालयाने अश्विन नाईक व अन्य सात जणांची निर्दोष सुटका केली.

अश्विन नाईक, प्रमोद बापू केळुस्कर, प्रथमेश बाबुराव परब ऊर्फ सोन्या, जनार्दन दाजी सकपाळ ऊर्फ जन्या, राजेश नारायण तांबे, अविनाश दत्तात्रय खेडकर ऊर्फ अवि, मिलिंद प्रभाकर परब ऊर्फ काण्या आणि सूरज कुमार गोवर्धन पाल ऊर्फ सनी या सर्वांची विशेष न्यायालयाने सुटका केली. या सर्वांवर मोक्कांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता, तसेच अपहरण, खंडणी, शस्त्र बाळगल्याप्रकरणीही गुन्हा नोंदविण्यात आला होता.

सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, ९ डिसेंबर, २०१५ रोजी अश्विन नाईकाच्या गुंडाने बंदुकीचा धाक दाखवून दादरच्या एका बिल्डरचे अपहरण केले. तेथून त्याला नाईकच्या एनएम जोशी मार्गावरील कार्यालयात नेले. त्यांनी त्या बिल्डरकडून ५० लाख रुपयांची खंडणी मागितली, तसेच बिल्डर बांधत असलेल्या इमारतीत ६,००० चौरस फुटांचा फ्लॅट देण्याचीही मागणी केली. बिल्डरने ते मान्य केले. मात्र, नाईकच्या कार्यालयातून सुटका झाल्यावर त्याने पोलीस ठाण्यात तक्रार केली.

नाईकला अटक करण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला. नाईक आणि त्याचे दोन गुंड बिल्डरकडे रक्कम घेण्यासाठी येत असताना पोलिसांनी त्याला शंकर रोड येथे ताब्यात घेतले. बिल्डरकडून पैसे घेताना पोलिसांनी त्याला व त्याच्या सहकाऱ्यांना रंगेहाथ पकडले. मात्र, नाईकच्या वकिलांनी ५० लाख रुपये खंडणीचे नसून त्यांच्यात एक व्यवहार झाला होता, त्याचेच ते पैसे होते. न्यायालयाने सर्व आरोपींची या आरोपातून सुटका करून, त्यांना कारागृहातून बाहेर काढण्याचे आदेश दिले.