Join us

नगरसेवक राजा गवारीसह सात जणांना जन्मठेप

By admin | Published: February 19, 2016 3:27 AM

नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक दीपक पाटील हत्येप्रकरणी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.एस. भैसारे यांनी ठाणे महापालिकेतील नगरसेवक

ठाणे : नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक दीपक पाटील हत्येप्रकरणी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.एस. भैसारे यांनी ठाणे महापालिकेतील नगरसेवक राजा गवारीसह सात जणांना गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शिवसेनेचे नगरसेवक रवींद्र फाटक यांचे गवारी हे खंदे समर्थक आहेत. गवारी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर त्याने फाटक यांच्यासह शिवसेनेसोबत घरोबा केला. ही घटना ४ जून २०११ रोजी ठाण्यातील कळवा-विटावा ब्रीजजवळ घडली होती. एका खासगी मालमत्तेच्या विकासाचे कंत्राट मिळवण्यावरून २००९ साली नवी मुंबईतील शिवसेना नेते विजय चौगुले यांचे बंधू नगरसेवक देवीदास चौगुले यांची हत्या झाली होती. त्या हत्येप्रकरणी आरोपी असलेले बांधकाम व्यावसायिक दीपक पाटील पेरोलवर सुटले होते. ४ जानेवारी २०११ रोजी दुपारी १च्या सुमारास मित्रांसह ते ठाणे न्यायालयातून गाडीमधून घरी जात होते. याचदरम्यान, त्यांच्या मागावर असलेल्या मारेकऱ्यांनी विटावा सब-वेनजीक त्यांचा रस्ता अडवून त्यांच्या दिशेने गोळीबार केला. या हल्ल्यात पाटील यांचा मृत्यू झाला. घटनेच्या तब्बल ४५ दिवसांनी कळवा पोलिसांनी या प्रकरणी राजा गवारी (३८), अतुल देशमुख (३४), राजा ठाकूर (३१), जयदीप साळवी (३५), सुजित सुतार (३५), बत्र्या न्यायनिर्गुणे (३४) आणि नितीन वैती (३५) यांना मुंबई-गोवा महामार्गावर अटक केली. हे सर्व जण कुख्यात गुन्हेगार असून, त्यांच्याविरोधात हत्या, हत्येचा प्रयत्न, दरोडा आदींसारखे गुन्हे दाखल आहेत. या खटल्याची अंतिम सुनावणी गुरुवारी ठाणे न्यायालयात झाल्यावर त्यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सर्व आरोपींनी सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्याचे ठरवल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)