बोगस डिग्रीप्रकरणी सात जणांना कोठडी

By admin | Published: July 31, 2014 01:58 AM2014-07-31T01:58:16+5:302014-07-31T01:58:16+5:30

बोगस डिग्री विक्री प्रकरणात गुन्हे शाखा पोलिसांनी एकूण सात जणांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून सुमारे ६ लाख ४० हजार रुपये किमतीचे साहित्य जप्त केले आहे

Seven persons detained for bogus degree | बोगस डिग्रीप्रकरणी सात जणांना कोठडी

बोगस डिग्रीप्रकरणी सात जणांना कोठडी

Next

नवी मुंबई : बोगस डिग्री विक्री प्रकरणात गुन्हे शाखा पोलिसांनी एकूण सात जणांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून सुमारे ६ लाख ४० हजार रुपये किमतीचे साहित्य जप्त केले आहे. या कारवाईत मुंबईमधील एका मुख्याध्यापिकेचाही समावेश आहे.
नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ३ जुलै रोजी दिवाळे गाव येथे ही कारवाई केली होती. या कारवाईत नीलेश डोके हा चालवत असलेला बनावट डिग्रींचा छापखाना उद्ध्वस्त करण्यात आला होता. त्याने प्रवीण चव्हाण आणि जयदेव दावणे या साथीदारांच्या माध्यमातून देशभर तसेच देशाबाहेर हे बोगस डिग्रीचे जाळे पसरवले होते. मात्र पोलिसांना यासंबंधीची माहिती मिळताच तिघांनाही अटक करण्यात आली होती.
या प्रकरणाच्या तपासानुसार पोलिसांनी नुकतीच इतर चार जणांना अटक केली आहे. मूर्ती पांडीयन (३२), चेतना छेडा (३४), मनोज विसपुते (३५) आणि सतीश विश्वकर्मा (५३) अशी त्यांची नावे आहेत. त्यानुसार अद्यापपर्यंतच्या तपासात ६ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त झाला असल्याचे गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा कोकणे यांनी सांगितले. जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये संगणक, प्रिंटर, लॅपटॉप, स्टँप, छपाई मशिन व इतर साहित्यांचा समावेश आहे. त्याशिवाय सुमारे ७ हजार बोगस प्रमाणपत्रेही यापूर्वीच जप्त केलेली आहेत. चेतना छेडा ह्या मुंबई येथील एमएस महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका आहेत. त्यांनी डोके याच्याकडून एफवाय व एसवायच्या बोगस डिग्री घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांना थेट टीवायमध्ये प्रवेश दिला होता. ही प्रमाणपत्रे बोगस असतानाही छेडा यांनी डोके याच्याशी संगमनत करून हा प्रकार केला होता, तर मूर्ती याने बोगस डिग्रीच्या माध्यमातून खाजगी बँकेत नोकरी मिळवली होती. त्यामुळे त्यालाही पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. मनोज याचा स्वत:चा घरगुती छापखाना असून तो डोके याला मुंबई विद्यापीठाची बनावट गुणपत्रके बनवून द्यायचा, तर विश्वकर्मा हा उत्तरप्रदेश येथील वैद्यकीय महाविद्यालयात कामाला आहे. तो डोके याने बनवलेल्या बनावट प्रमाणपत्रांचे त्याच महाविद्यालयात रजिस्ट्रेशन करून द्यायचा. त्यानुसार अधिक तपासात या चार जणांवर कारवाई करण्यात आली असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कोकणे यांनी सांगितले. या बोगस डिग्री प्रकरणात अद्यापपर्यंत सात जणांना अटक झाली असून त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली असल्याचेही त्यांनी सांगितले.
या प्रकरणात अद्यापही बरेच महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील बाजारे अधिक तपास करीत आहेत. तर या बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे ठिकठिकाणी नोकऱ्या प्राप्त करणाऱ्यांचाही पोलिसांकडून शोध सुरु आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Seven persons detained for bogus degree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.