Join us

अंधेरीतील सेव्हन सिल्स हॉस्पिटल मुंबई महापालिकेने ताब्यात घ्यावे; काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By मनोहर कुंभेजकर | Published: September 26, 2023 3:46 PM

अंधेरीतील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या हॉस्पिटलची बाजारभावानुसार ३००० ते ४००० कोटी रुपये किंमत आहे .

मुंबई-अंधेरी (पूर्व ) मरोळ येथील अत्याधुनिक सेव्हन हिल्स हॉस्पिटल आरोग्य सेवेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. शहराच्या मोक्याच्या जागी १६ एकर जागेवर असलेल्या १५०० खाटांच्या या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या सोयी सुविधा आहेत.  हॉस्पिटल सध्या दिवाळखोरीत निघालेले असल्याने ते ताब्यात घेऊन ‘एम्स’सारखे हॉस्पिटल येथे सुरु करता येणे शक्य आहे. मुंबई व महाराष्ट्राच्या जनतेला उत्तम आरोग्य सेवा पुरवण्यासाठी हे हॉस्पिटल महत्वाची भूमिका बजावू शकते. खाजगी कंपनीच्या घशात हे हॉस्पिटल घालण्याऐवजी मुंबई महापालिकेनेच ते ताब्यात घ्यावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुंबईचे माजी उपमहापौर राजेश शर्मा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात ते म्हणाले की, मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारने सार्वजनिक गरजा लक्षात घेऊन व्यापक दृष्टीकोन ठेवण्याची गरज आहे आणि प्रगत वैद्यकीय संशोधन केंद्र आणि शिक्षणासह आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉस्पिटल म्हणून विकसित करण्याचा विचार करणे आवश्यक आहे. सेव्हन हिल्स हॉस्पिटलच्या आवारात शिल्लक असलेल्या जागेवर मेडीकल व नर्सिंग कॉलेज सुरु करता येउ शकते. सेव्हन हिल्स हॉस्पिटलच्या जागेचा मुळ मालकी हक्क मुंबई महानगरपालिकेचा आहे. महानगरपालिकेने ही जागा सेव्हन हिल्स हॉस्पिटलला लीजवर दिलेली आहे. मुंबई महापालिकेने दुसऱ्या कोणत्याही खाजगी कंपनीच्या ताब्यात ती जागा जाऊ न देता स्वतः ताब्यात घेतली तर मुंबईमध्ये एक प्रशस्त, अत्याधुनिक, सर्व सोयीनियुक्त असे महत्वाचा आरोग्य केंद्र बनू शकते.

अंधेरीतील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या हॉस्पिटलची बाजारभावानुसार ३००० ते ४००० कोटी रुपये किंमत आहे पण या जागेकडे व्यापारी दृष्टीकोनातून न पाहता मानवी दृष्टीकोनातून त्याकडे पाहिले पाहिजे. याच हॉस्पिटलमध्ये कोराना महामारीच्या काळात सुसज्ज कोवीड सेंटर उभे केले होते, ज्याचा मुंबईकरांना मोठा फायदा झाला होता. एवढे प्रशस्त व सुविधायुक्त नवीन हॉस्पिटल उभे करणे सोपे नाही. मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेता त्यांच्या आरोग्य सेवांसाठी हे हॉस्पिटल एक मोठी संधी आहे, त्यासाठी सध्या असलेल्या सर्व सुविधांचा विचार करता मुंबई महानगरपालिकेने वेळ न घालवता हे हॉस्पिटल ताब्यात घेऊन मुंबईकरांना अत्याधुनिक आरोग्य सेवा देण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी राजेश शर्मा यांनी केली.