दहिसर नदीला नवसंजीवनी देणार सात ‘स्ट्राँग ट्रिटमेंट प्लान्ट’
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 12:53 AM2018-12-13T00:53:54+5:302018-12-13T00:54:13+5:30
पोयसर आणि ओशिवरा नदीवरही होणार व्यवस्था; प्रदूषण होणार कमी
- सागर नेवरेकर
मुंबई : दहिसर, पोयसर, ओशिवरा आणि मिठी नदी या मुंबईतल्या नद्यांना नवसंजीवनी देण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू असून त्यासाठी वेगवेगळ्या योजना आखल्या जात आहेत. त्यात दहिसर नदीवर ‘स्ट्राँग ट्रिटमेंट प्लान्ट’ (एसटीपी) बसविण्याचे काम सुरू झाले आहे. एसटीपीमुळे नदीत सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया होऊ शकेल व नदी दूषित होणार नाही़ त्यामुळे हा प्रकल्प मुंबईच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.
दहिसर, पोयसर आणि ओशिवरा या तिन्ही नद्यांवर वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. त्यानुसार दहिसर नदीवर सात, पोयसर नदीवर नऊ आणि ओशिवरा नदीवर नऊ एसटीपी बसविण्यात येणार आहेत, असे रिव्हर मार्चचे सदस्य विक्रम चोगले यांनी सांगितले.
तिन्ही नद्यांच्या एसटीपीसाठीचे बजेट ५१४ कोटी रुपयांचे आहे. श्रीकृष्ण नगर येथे पूल आहे. पुलाला जोडून एक नवा बंधारा बांधून एसटीपी बसविण्यात येणार आहे. कुलूपवाडी आणि रहेजा येथील नागरी वस्तीतून १ लाख ८० हजार लीटर सांडपाणी नदीमध्ये जमा होते. त्यावर एसटीपीद्वारे प्रक्रिया करून स्वच्छ पाणी नदीमध्ये सोडले जाणार आहे. सुकुरवाडी येथील पुलावरही एसटीपी बसवून दौलत नगर परिसरातील तबेला, नागरी वस्तीतून येणाºया सांडपाण्यावर प्रक्रिया करून नदीत सोडले जाईल, अशीही माहिती विक्रम चोगले यांनी दिली.
प्राधिकरण कधी?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर स्थानिक आमदार, महापालिका अधिकारी आणि तिवर क्षेत्राचे अधिकारी यांची मुंबईतल्या नद्यांच्या संदर्भात बैठक झाली होती. त्यात, मुंबईतील चारही नद्यांचे प्राधिकरण करण्यात यावे असा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार मिठी नदीचे पुनर्जिवीत प्राधिकरण झाले; परंतु दहिसर, पोयसर आणि ओशिवरा नद्यांचे प्राधिकरण थांबले आहे.
बंधारे बांधण्याची मागणी
‘स्ट्राँग ट्रिटमेंट प्लान्ट’मुळे नद्यांमधील दूषित पाण्यावर प्रक्रिया झाल्याने स्वच्छ नदी स्थानिकांना मिळेल. पश्चिम उपनगरात पहिल्यांदा एखाद्या नदीवर कोल्हापुरी बंधारा बांधला जात आहे. परतीचा पाऊस थांबवून नदीची झीज थांबविली जाईल. त्यामुळे नद्यांवर अशा प्रकारे दोन-दोन किलोमीटरवर बंधारे बांधून त्यात ‘स्ट्राँग ट्रिटमेंट प्लान्ट’ बसविण्यात यावेत, अशी रिव्हर मार्च टीमची मागणी आहे.
नदीत येणाºया सांडपाण्यावर एसटीपीद्वारे प्रक्रिया करून हे स्वच्छ पाणी नदीत सोडले जाणार आहे. या सात एसटीपीच्या मदतीने ही नदी पुन्हा जिवंत केली होईल, असा विश्वास रिव्हर मार्चला वाटतो आहे.
भारतातील नदीवरील पहिला प्लान्ट
जलजागृती अभियान प्रकल्पाचे प्रमुख हिमांशू मेहता म्हणाले, आर्ट आॅफ लिव्हिंगच्या वतीने राज्यातील २९ नद्यांना पुनर्जीवित करण्यात आले आहे. मराठवाड्यातील लातूर विभागात जलजागृती अभियानातून पाच लाख लोकांना फायदा झाला आहे.
आता दहिसर नदीवर बंधारा बांधण्याचे काम सुरूअसून ते डिसेंबरअखेरपर्यंत संपेल. दहिसर नदीवरील हा प्लान्ट भारतातील पहिला आहे. नदीची पातळी कमी झाल्यावर जमिनीतले पाणी सहज उपलब्ध होत नाही. दहिसर नदीचे पाणी खूप दूषित आहे. त्यामुळे नुसता बंधारा बांधून काही होणार नाही; तर नदीच्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठीचे प्रयत्नसुद्धा सुरू आहेत.
पोयसर नदीचे ‘स्ट्राँग ट्रिटमेंट प्लान्ट’ : रामगड नगर, आनंद नगर (हनुमान नगर), दुर्गा नगर (कुरार व्हिलेज पूल), पाटणकरवाडी (हनुमान नगर पूल), महिंद्रा कंपनीजवळचा नाला, गावदेवी (रेल्वे रुळाशेजारी), गावदेवी येथील म्युनिसिपल सर्व्हिस येथील मोकळी जागा, गोवर्धन नगर (सुंदरपाडा, कमला नेहरू नाला, तुळसकरवाडी), हेमू कॉलनी (पारस नगर नाला), इराणी वाडी नाला, कांदिवली येथील संजय नगर या नऊ ठिकाणी बंधारे बांधून ‘स्ट्राँग ट्रिटमेंट प्लान्ट’ बसवून पोयसर नदीचे संवर्धन आणि शुद्धीकरण करण्यात येणार आहे.