महिलांच्या सबलीकरणासाठी 'तिनं' बाइकवरून पूर्ण केला 7000 किलोमीटरचा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2019 01:40 AM2019-08-05T01:40:10+5:302019-08-05T06:50:50+5:30
मुंबई ते लेह-लडाख प्रवास; महिलांच्या सबलीकरणासाठी अंकिताने केली जनजागृती
- सागर नेवरेकर
मुंबई : महिला या पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. यावेळी साहसी कृत्य करण्यातही महिला मागे राहिलेल्या नाहीत. अशाच बोरीवली येथे राहणाऱ्या बाइक रायडर अंकिता कारेकर यांनी नुकताच मुंबई ते लेह-लडाख असा खडतर प्रवास पूर्ण केला. प्रवासादरम्यान अंकिता यांनी पर्यटन क्षेत्रात शांतता आणि स्वच्छता राखावी, तसेच महिला सबलीकरण या विषयांची जनजागृती केली. अंकिता यांनी आतापर्यंत सात हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे.
बाइक रायडर अंकिता कारेकर यांनी सांगितले की, मुंबई ते लेह-लडाख हा प्रवास करण्यासाठी सोबत कोणाची मिळत नव्हती. यावेळी मी नुकताच एक ग्रुप जॉइन केला होता. त्यात दोन जण चांगले मित्र झाले होते. त्यांना या प्रवासाबद्दल सांगितले. मात्र, लेह-लडाख हा प्रवास खडतर होता. त्यामुळे एकटीने कसे काय जायचे, हाच विचार मनात होता, परंतु मला दोन मित्रांची साथ मिळाली आणि तिघांचा प्रवास सुरू झाला. या आधी गोवा आणि कर्नाटक हा सोलो प्रवास केला होता.
मुंबई ते लेह-लडाख प्रवासावेळी देशात वायुवादळ आले होते. आम्ही प्रवासाला सुरुवात केल्यावर ते गुजरातमध्ये धडकणार होते. मात्र, या वादळाने आम्हाला चंदीगडमध्ये गाढले. दरम्यान, चंदीगडला काही वेळ विश्रांती घेऊन स्पितीच्या प्रवासाला लागलो. त्यानंतर, रोहतांगवरून लेह-लडाखला गेलो. लेह-लडाखचा प्रवास हा काही जण १९ ते २० दिवसांत पूर्ण करतात, परंतु आमच्या हा प्रवास २५ दिवसांत पूर्ण झाला. प्रवासादरम्यान, दोन वेळा बाइक घाटावर पंक्चर झाली; अशा अनेक समस्यांचा सामना करून एकूण सात हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला.
नव्या वर्षात भूतान नेपाळ दौरा!
येत्या जानेवारी, २०२० यावर्षी भूतान आणि नेपाळची बाइकवरून राइड करायचा मानस आहे. लेह-लडाख राइडनंतर आत्मविश्वास वाढला असून, भूतान व नेपाळ हा प्रवास सोलो करण्याचा विचार आहे. नैसर्गिक सौंदर्यांनी नटलेल्या ठिकाणांची शांतता आणि सौंदर्य अबाधित राहावे आणि महिला सबलीकरण याबाबत प्रवासातून जनजागृती करण्यात आली, अशीही माहिती कारेकर यांनी दिली.