मुंबई : किमान सात हजारांची पगारवाढ, वेतनवाढीच्या दहा टप्प्यांची जानेवारीपासून होणारी अंमलबजावणी आणि विलीनीकरणापासून अन्य मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी लवाद नेमण्याची मागणी मान्य झाल्याने नऊ दिवस सुरू असलेला बेस्ट कामगारांचा संप बुधवारी दुपारी मागे घेण्यात आला.
मागण्या मान्य करण्यास, त्याबाबत लेखी आश्वासन देण्यास शिवसेनेने नकार दिल्याचा मुद्दा जाहीरपणे मांडत बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीचे नेते शशांक राव यांनी शिवसेनेला यापुढे किती मदत करायची, हे आता बेस्टचे कामगारच ठरवतील, असा इशाराही दिला. तेव्हा जल्लोष करणाऱ्या कामगारांनी ‘शेम शेम’च्या घोषणा देत शिवसेनेविरोधातील संताप व्यक्त केला.
बेस्ट कामगारांच्या संपावेळी झालेल्या चर्चेत बेस्टला किती मदत करायची? पैसे कुठून आणायचे? असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सांगत होते. कृती आराखड्याच्या नावाखाली ‘कामगारांचे मृत्युपत्र’ तयार करण्यात आले होते. मात्र कामगारांनी एकजुटीची ताकद दाखवल्याने कनिष्ठ कामगारालाही किमान सात हजारांची पगारवाढ मिळणार आहे. ही वाढ जानेवारी महिन्याच्या पगारातूनच मिळेल, असे राव यांनी वडाळा येथील कामगारांच्या मेळाव्यात जाहीर केले.
विविध मागण्यांसाठी बेस्ट कामगारांच्या सुरू असलेल्या संपावर बुधवारी उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत कामगारांच्या मागण्या मान्य झाल्याचे समजताच वडाळा येथील बेस्ट वसाहतीत कामगारांनी जल्लोष केला. तेव्हा घेतलेल्या मेळाव्यात कामगारांना चर्चेची माहिती देताना राव यांनी शिवसेनेवर हल्ला चढविला. ‘नऊ दिवसांचा हा लढा आज यशस्वी झाला. अनेक लोकांना मिरची लागली. आश्वासनांबाबत लेखी लिहून घ्या, असे संदेश काही लोकपसरवत होते. त्यांना सांगा, न्यायालयाने लिहूनच दिले आहे. त्यामुळे उद्या मागण्या मान्य न झाल्यास न्यायालयच निर्णय घेईल,’ असे प्रत्युत्तर त्यांनी दिले.
महापौरांनी बोलावलेल्या चर्चेत करार संपल्यानंतरच्या पावणेतीन वर्षांतील पगारावर पाणी सोडा, असे सांगण्यात आले होते. तसेच दीड हजार बसगाड्यांच्या खासगीकरणाचाही प्रस्ताव होता. बेस्टचे हे ‘मृत्युपत्र’ मान्य करा, असा आग्रह सुरू होता. त्यावर सही करण्यास आम्ही नकार दिला. न्यायालयानेही ते बाजूला ठेवले. त्यामुळे बेस्ट उपक्रमातील कनिष्ठ कामगारांनाही कमीतकमी सात हजार रुपये पगारवाढ मिळणार आहे, असा दावा राव यांनी केला. हा लढा ऐतिहासिक असून याचे श्रेय त्यांनी कामगारांना दिले आणि संप मागे घ्यायचा का? असे विचारताच कामगारांनी एकमुखी होकार देताच संप मागे घेत असल्याची घोषणा राव यांनी केली.
एकच लक्ष्य... शिवसेनाबेस्ट उपक्रमातील ज्युनियर ग्रेडमधील भ्रष्टाचार सत्ताधाºयांना संपवता आला असता. वेतन करार संपल्यानंतर गेले पावणेतीन वर्षे कामगारांच्या मागण्यांवर बोला, असे सांगत होतो. मात्र पैसे कुठे आहेत, असेच सत्ताधारी बोलत राहिले. संपाला पाठिंबा देणाºयांनी नंतर माघार घेतली. यांच्या नीतीनुसार चाललो असतो, तर कामगारांच्या आहे त्या नोकºयाही गेल्या असत्या, असा हल्लाच राव यांनी शिवसेनेवर चढवला.
ऐतिहासिक लढाकामगारांना ‘मेस्मा’ अंतर्गत नोटिसा पाठवून कारवाईची धमकी देण्यात येत होती. घरे रिकामी करण्यास सांगितले जात होते. मात्र हा लढा ऐतिहासिक असल्याने या नोटिशीची फ्रेम करून कामगारांना आपल्या घरात लावता येईल, असा टोला राव यांनी लगावला. संपात सहभागी झालेल्या एकाही कामगारावर कारवाई होणार नाही, असे त्यांनी जाहीर केले.कामगारांना अशी मिळणार वाढ३१ मार्च २०१६ रोजी कामगारांचा वेतन करार संपला. त्यामुळे नवीन करारानुसार १ एप्रिल २०१६ पासूनच कामगारांना थकबाकी मिळणार आहे. तसेच ज्युनिअर ग्रेडच्या कामगारांनाही किमान सात हजारांची वाढ मिळेल. ही वाढ जानेवारी महिन्याच्या वेतनातच मिळेल. तसेच बेस्ट उपक्रमाचे महापालिकेत विलीनीकरण करण्याचा मार्गही मोकळा झाल्याचे राव यांनी सांगितले.
...आणि बस रस्त्यावर : कामगार नेते शशांक राव यांनी संप मागे घेतल्याची घोषणा करताच अवघ्या १५ मिनिटांत वडाळा बस आगारातून बेस्टची पहिली बस क्र. ४५३ दुपारी ३.४५ च्या सुमारास बाहेर पडली. कामगारांनी जल्लोष केला आणि प्रवाशांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला.पालिका कर्मचारीही संपाच्या पवित्र्यातबेस्ट उपक्रमातील कामगारांचा संप यशस्वी ठरल्यामुळे मुंबई महापालिकेतील कर्मचाºयांनीही पगारवाढीच्या मुद्द्यावर संपाचा पवित्रा घेतला आहे. पालिका कर्मचाºयांचाही वेतन करार पाच वर्षांपासून रखडला आहे. मात्र बेस्टप्रमाणे महापालिकेतही मतदान घेऊनच संपाचा निर्णय घेतला जाईल.बेस्टच्या संपापूर्वी झालेल्या मतदानात ९५ टक्के कामगारांनी संपाच्या बाजूने कौल दिला होता. त्याच पद्धतीने महापालिका कामगारांच्या पगारवाढीसाठी संप करायचा का, यावर फेब्रुवारीत मतदान घेण्यात येईल. त्यात कामगारांचा जो कौल असेल, त्यानुसार पुढील पावले उचलली जातील, असे कामगार नेते शशांक राव यांनीही जाहीर केले.