दक्षिण मुंबईतील सात हजार झोपडीवासीयांचे होणार पुनर्वसन, एसआरएअंतर्गत मिळणार झळाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 04:20 AM2017-09-28T04:20:55+5:302017-09-28T04:21:03+5:30
ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व असलेली दक्षिण मुंबई येत्या काळात झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी कफ परेड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गणेशमूर्तीं नगर गृहनिर्माण संस्थेची नुकतीच स्थापना करण्यात आली
मुंबई : ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व असलेली दक्षिण मुंबई येत्या काळात झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी कफ परेड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गणेशमूर्तीं नगर गृहनिर्माण संस्थेची नुकतीच स्थापना करण्यात आली असून या पुनर्विकासांतर्गत तब्बल सात हजार झोपडीवासीयांना हक्काचे घर मिळणार आहे.
कफ परेड येथील या ३२ एकर भूखंडावर गेल्या ४0 वर्षांत झोपडपट्टयांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. दक्षिण मुंबईतील मोक्याच्या जागेवरील या झोपडपट्टयांमुळे शहराला बकाल स्वरूप आले होते. येथील रहिवाशांना सर्व सोयी-सुविधा मिळाव्यात तसेच ते मुख्य प्रवाहात यावे यासाठी येथील स्थानिक ९२ गृहनिर्माण संस्था व त्यातील सात हजार झोपडीवासीयांनी पुढाकार घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गणेशमूर्ती नगर या नावे गृहनिर्माण संस्था स्थापन
केली.
या संस्थांच्या माध्यमातून येत्या काळात एसआरएअंतर्गत रहिवाशांचे पुनर्वसन होणार असल्याची माहिती या गृहनिर्माण संस्थेचे सल्लागार विनायक वेंगुर्लेकर व मुख्य प्रवर्तक प्रकाश घाडगे यांनी नुकताच चर्चगेट येथील वाय. बी. चव्हाण येथे पार पडलेल्या संस्थेच्या सर्वसाधारण सभेत प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
या सभेचे अध्यक्ष प्रशांत घाडगे यांच्या उपस्थितीत अनेक ठराव मंजूर करण्यात आले. यावेळी माजी राज्यमंत्री चंद्रकांत त्रिपाठी, राम क्षीरसागर आदी उपस्थित होते. हा प्रकल्प महाराष्ट्र शासनाच्या मोफत घरकुल योजनेत समाविष्ट असून या प्रकल्पामुळे येत्या काळात दक्षिण मुंबईच्या वैभवात आणखी भर पडणार असल्याचे बोलले जात आहे.