मुंबई : अवघे दोन टक्के मृत्यू दर असणाऱ्या कोरोना व्हायरसने सध्या जगभर हाहाकार उडवला आहे. राज्यात बोटावर मोजण्या इतके संशयीत रूग्ण आढळले असले तरी कोरोनाला रोखण्यासाठी यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. पण, करोनापेक्षा भयानक स्थिती रस्ते अपघातांची आहे. विधिमंडळातील आकडेवारीनुसार जानेवारी ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत तब्बल ७ हजार ३१० लोकांना रस्ते अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे.
काँग्रेस सदस्य अनंत गाडगीळ यांनी रस्ते अपघातांबाबतचा तारांकीत प्रश्न उपस्थित करत रस्ते अपघातांची माहिती मागितली. शिवाय, या अपघातांमागे मद्यपान, निष्काळजीपणे वाहन चालवणे, वाहतुक नियमांचा भंग आदी कारणे आहेत का असा सवाल केला . या प्रश्नाच्या लेखी उत्तरात गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, २०१८ च्या तुलनेत २०१९ साली रस्ते अपघातात दह टक्क्यांची घट झाली आहे. शिवाय, अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांमध्ये वेग मर्यादेचे उल्लंघन करुन वाहन चालविणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे.
रस्त्यावरील वाढते अपघात रोखण्यासाठी क्रॅश अनॅलिसीस सेंटर सुरू करण्यात आले आहेत. वेगाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी स्पीड डिटेक्टर कॅमेरे बसविण्यात आले आहेत. रोड सेफ्टीबद्दल प्रबोधन, वाहतूक व अपघाताची माहिती देण्याकरिता हेल्पलाईन नंबर आणि एमटीपी अँप सुरु करण्यात आले आहे. अपघातात जखमी झालेल्यांना तात्काळ वैद्यकीय मदत देण्यासाठी महामार्गावर ट्रामा केअर सेंटर उभारण्यात आल्याचेही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे.