मध्य रेल्वेच्या पाच विभागांतून ६८ लाखांची तिकिटे जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 06:01 AM2019-06-17T06:01:26+5:302019-06-17T06:01:45+5:30
‘ऑपरेशन थंडर’च्या अंतर्गत रेल्वे सुरक्षा बलाने राबविली मोहीम
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ आणि नागपूर या पाच विभागात रेल्वे सुरक्षा बलाने ‘आॅपरेशन थंडर’ राबवून तिकिट दलालांचा अनधिकृत व्यवहार उधळला आहे. मध्य रेल्वेच्या पाच विभागातून ६८ लाख रुपयांची ३ हजार ५१५ अनधिकृत ई- तिकिटे जप्त करून ३५ आरोपींना अटक केली आहे.
रेल्वे सुरक्षा बलाचे महासंचालक अरूण कुमार यांनी आरपीएफ कायदा कलम १४३ अंतर्गत रेल्वे तिकिटांचा अनधिकृत व्यवहार करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार देशभरातील मध्य रेल्वे मार्गावर राबवलेल्या ‘आॅपरेशन थंडर’ मोहीमेंतर्ग महाराष्ट्रातील मध्य रेल्वेच्या पाच विभागातून तब्बल ६८ लाख २५ हजार ४९९ रुपयांची ई-तिकिटे जप्त केली.
महाराष्ट्रातील पाच विभागात मध्य रेल्वे मार्गावर २१ खासगी ट्रॅव्हल एजन्सीकडून एकूण ३२ प्रकरणे दाखल झाली. यामध्ये घाटकोपर, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, डोंबिवली, नागपूर, नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, शिर्डी, सोलापूर, पुणे, चिंचवड, पिंपरी आणि सांगली या ठिकाणांतून तिकिट दलालांवर कारवाई करण्यात आली आहे.
तिकीट दलालाची करू शकता तक्रार
मध्य रेल्वे मार्गावर तिकिट काढण्यासाठी काही प्रवाशांना दलालाच्या कटकटीला सामोरे जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुंबई विभागाच्या रेल्वे सुरक्षा बलाच्यावतीने हेल्पलाइन क्रमांक प्रवाशांसाठी सुरू केली आहे. त्यानुसार प्रवासी ९९८७६४५३०७ या हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार दाखल करू शकतो. यासह दलालाचा फोटो काढून व्हॉट्सअॅपद्वारे पाठवू शकतो, असे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
पश्चिम रेल्वेच्या कारवाईत आढळली २२ लाखांची अनधिकृत ई- तिकिटे
मुंबई : सुट्टी आणि सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष मेल, एक्स्प्रेस चालविण्यात येतात. मात्र या गाड्यांच्या तिकिटांचा काळाबाजार करत तिकिट दलाल प्रवाशांची दुप्पट-तिप्पटीने लूट करतात. यामुळे पश्चिम रेल्वेने मार्गावरील रेल्वे सुरक्षा बलाच्यावतीने तिकिट दलालांच्या केंद्रावर थापा टाकून २२ लाख १७ हजारांची १ हजार ४२८ अनधिकृत ई-तिकिटे जप्त केले.
रेल्वे सुरक्षा बलाच्यावतीने तिकिट दलालांचा अनधिकृत व्यवहार रोखण्यासाठी ‘आॅपरेशन थंडर’ मोहिम देशभरात राबविण्यात येत आहे. याद्वारे देशभरातल्या तब्बल १०० शहरांमध्ये आॅपरेशन थंडर मोहिम राबवून रेल्वे सुरक्षा बलाने ९०० तिकिट दलालांवर कारवाई केली असून सुमारे ५ कोटींहून अधिक किंमतीची तिकिटेही रेल्वे सुरक्षा बलाने जप्त केली आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीत बाहेरगावी जाणाºयांची संख्या जास्त असते. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर उन्हाळी विशेष गाड्या चालविण्यात येतात. मात्र या गाड्यांची प्रवाशांना माहिती नसल्याने दलाल या गाड्यांसाठी तिकीट बुक करतात आणि नंतर ते जादा पैसे घेऊन विकत असल्याचे पाहायला मिळत आहे. आयआरसीटीसी संकेतस्थळ, पीआरएस काऊंटर, अधिकृत तिकिट स्रोतांकडून तिकिट काढावे. तिकिट दलालांकडून अनधिकृतरित्या तिकिट काढणे गुन्हा असून यावर शिक्षा केली जाते, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले.