Join us

"वाचवा वाचवा... हमें यहाॅं से निकालो"; गोरेगावमध्ये रात्री नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2023 8:26 AM

शुक्रवारच्या या अग्नितांडवात इमारतीतील सात जणांचा मृत्यू झाला तर ६८ जण जखमी झाले.

पवन देशपांडे

मुंबई : ‘वाचवा... वाचवा... बचाओ... बचाओ.. अरे भाई, हमें यहाँ से निकालो...’असा आक्रोश होत असतानाच जाग आली. रात्रीचे २.३० झाले होते. आमच्या बाजूच्या इमारतीला (जय भवानी सोसायटी) संपूर्ण धुराने वेढले होते. अकराव्या मजल्यावरून खाली पाहिले तर आगीच्या ज्वाळा सर्वत्र होत्या. धुराचे लोट आणि आक्रोश दोन्ही गोष्टींनी आसमंत भरला होता.

आमच्या सोसायटीने आमची पूर्ण इमारत रिकामी केली. सर्व रहिवाशांना बाहेर रस्त्यावर उभे केले; पण बाजूची इमारत धुमसत होती. काही तरुण, काही म्हातारे आणि काही तरुणीही बाजूच्या इमारतीची आग विझवण्यासाठी धडपडत होत्या. जय भवानी सोसायटीची पार्किंग जागा आगीत संपूर्ण वेढली गेलेली होती आणि आग पहिल्या व दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचली होती. आतील प्रत्येक जण आपलं कुटुंब वाचवण्यासाठी धडपडत होता. बाहेर सर्वजण आग विझवण्यासाठी लढत होते; पण आगीचे रूप रौद्र होते. एकानंतर एक मजले आग चढत जात होती. त्यातच काही गाड्यांच्या इंधन टाक्या फुटत होत्या आणि आग आणखी भडकत होती. आमच्या इमारतीला फायर सिस्टम व्यवस्थित होती. सर्व पाइपही होते, त्याचा उपयोग करण्याचा तत्काळ निर्णय झाला. अनेकांनी फायर ब्रिगेडला अनेक कॉल केले. ते कदाचित रस्त्यात होते. वाचवा वाचवा अशा किंकाळ्या बंद झाल्या होत्या.

वरून आवाज का येत नाहीये... याचा विचार करूनच अंगाला काटा येत होता. काही नागरिक जीव वाचवण्यासाठी आपल्या कुटुंबाला घेऊन आग लागलेल्या इमारतीच्या छतावर पोहोचले. काही अडकले. तोवर आग विझवण्यासाठी आम्ही आमची फायर फायटिंग सिस्टम सुरू करून जय भवानी सोसायटीवर पाण्याचे फवारे मारणे सुरू केले. आग विझण्याचे नाव नव्हते. तोवर जय भवानी सोसायटीला लागून असलेल्या समर्थ सृष्टी इमारतीचा पहिला मजला आगीच्या विळख्यात सापडला होता. ते बरे की तिथले लोक आधीच बाहेर पडलेले होते. फायर ब्रिगेडच्या अनेक गाड्या दाखल झाल्या. साडेतीन वाजले असतील तोवर. त्यांनी आग विझवण्याच्या मोहिमेचा पूर्ण ताबा घेतला; पण आग सहजासहजी आटोक्यात येत नव्हती. सुरुवातीला संपूर्ण पार्किंगमध्ये आग विझवण्यात आली. नंतर पहिला मजला, नंतर दुसऱ्या, तिसऱ्या मजल्यावर फवारे सुरू झाले.

पार्किंगमधील सर्वच गाड्यांचा सांगाडा उरला होता. माझी आई, माझी मावशी... माझी दोन छोटी पोरं याच इमारतीत राहतात... त्यांना बाहेर काढा... असा हंबरडा फोडत काही नातेवाईक आगीची पर्वा न करता पुढे जाण्याचा प्रयत्न करत होती; पण ते शक्य नव्हते. फायर ब्रिगेडच्या जवनांनी त्यांचे काम केले. चार वाजेपर्यंत आग आटोक्यात आली. तोवर फायर ब्रिगेडचे जवान इमारतीत शिरले होते. त्यांनी शोधाशोध सुरू केली. कोण कुठे अडकलंय, कुठे जखमी अवस्थेत... बेशुद्धावस्थेत आहे, ते पाहून खाली कॉल जात होता. नंतर त्यांना ॲम्ब्युलन्सने रुग्णालयांमध्ये पाठवले जात होते. जे शुद्धीवर होते, ज्यांना काहीही इजा झाली नाही; पण मनावर आगीची दहशत पसरली होती, त्यांना बाजूच्या आझाद मैदानात मोकळ्या हवेत बसवण्यात आले. वाचलेल्यांची विचारपूस करत त्यांना धीर देण्याचा प्रयत्नही काहीजण करत होते.

माझी दोन छोटी मुलं वर अडकल्याचे सांगत धाय मोकलून रडणाऱ्याला वरून कॉल आला आणि त्याच्या जिवात जीव आला. दोन्ही मुलं सुखरूप होती. एकाने आपल्या संपूर्ण कुटुंबाला दुसऱ्या मजल्यावरून बाहेर काढताना आपण किती भाजले जातोय, याची पर्वा केली नाही. त्यात त्याचा संपूर्ण हात भाजला होता. पत्नीही भाजली आणि दोन लहान मुलांचे पाय चांगलेच भाजले गेले. एक तरुणी केवळ चप्पल राहिली म्हणून आपल्या घरच्यांना खाली सोडून परत वर गेली; ती खाली येऊच शकली नाही. धुरात अडकली आणि... जय भवानी सोसायटी संपूर्ण काळवंडली होती.

‘एसआरए’ची इमारत होती ती. त्यामुळे राहणारे कसे असतील, याचा विचार आपण करू शकतो. रोजीरोटीसाठी फिरणारे अनेक होते. घरोघरी कपड्यांच्या बदल्यात भांडे देणाऱ्या महिला इथे राहत होत्या. काहींचा जुन्या कपड्यांचा व्यवसाय होता. काही मजुरी करायचे. त्यामुळे इमारतीच्या अनेक भागांमध्ये कपड्यांचेच ढीग पडलेले असायचे. एका मजल्यावर ९ फ्लॅट... दोनशे-सव्वादोनशे स्क्वेअर फुटांचा एरिया... असे सात मजले... एवढ्या कमी जागेत ३५० ते ४०० लोक होते. या सर्व निष्पाप लोकांसाठी शुक्रवारची पहाट होण्यापूर्वी काळरात्र झाली. यातल्या अनेकांचे जीव गेले. काही अजूनही उपचार घेत आहेत. 

सकाळनंतर आगीचे वृत्त वाऱ्यात धूर पसरत जावा तसे पसरत गेले. मग एरियातल्या छोट्या-मोठ्या नेत्यांपासून ते आमदार, खासदार, मंत्री, पालकमंत्री आणि इतर अनेक नेते येऊन गेले. सांत्वन करण्याचा प्रयत्न होत होता. काहींना आश्वासने दिली जात होती. माझा नंबर घेऊन ठेवा... एक-दोन दिवसांत येऊन भेटा.. अशी आश्वासक सादही दिली जात होती. पण माणसं गेली त्याचं काय? एसआरएची इमारत गरिबांची असल्याने त्याकडे किती दुर्लक्ष होणार आहे? पाणी नाही, फायर सिस्टम नाही अन् त्याचे कधी ऑडिटही नाही... याची कोणीही दखल घेतली नाही.

आता आग कशी लागली याची थिअरी मांडली जाईल. मदतीच्या घोषणा झाल्या आहेतच... अजूनही होतील; पण प्रत्यक्ष ज्यांच्यावर बेतले... त्यांनी त्यांच्या पुढच्या आयुष्याची थिअरी कशी मांडायची... आणि माणूस गेल्याची... माणूस आगीने अधू झाल्याची मनातील आग कोणत्या कुटुंबाने कशी विझवायची...?

टॅग्स :आगमुंबई