‘मेट्रो ३’ भुयारीकरणाचा सतरावा टप्पा पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 04:35 AM2019-08-16T04:35:02+5:302019-08-16T04:35:26+5:30
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गावर एमएमआरसीमार्फत भुयारीकरणाचे काम सुरू आहे. या मार्गिकेच्या भुयारीकरणाच्या सतराव्या टप्प्याचे काम नुकतेच पूर्ण झाले.
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गावर एमएमआरसीमार्फत भुयारीकरणाचे काम सुरू आहे. या मार्गिकेच्या भुयारीकरणाच्या सतराव्या टप्प्याचे काम नुकतेच पूर्ण झाले. या मार्गिकेतील सारीपुतनगर ते सीप्झ मेट्रो स्थानक यादरम्यानचे ५७४ मीटर अंतराचे हे भुयारीकरण पूर्ण करण्यात आले. वैनगंगा-३ टीबीएमच्या साहाय्याने हे भुयारीकरण पूर्ण करण्यात आले. या मार्गिकेतील एकूण ३२.२६१ किमीचे भुयारीकरण पूर्ण झाले.
टीबीएम जमिनीमध्ये उतरवण्यासाठी सारीपुतनगर येथे लाँचिंग शाफ्ट तयार करण्यात आले आहे. या शाफ्टमधून वैनगंगा-३ या टीबीएमने ९ एप्रिल रोजी भुयारीकरणास सुरूवात केली होती. दरदिवशी ४.५५ मीटर या वेगाने वैनगंगा-३ या टीबीएमने १२६ दिवसांमध्ये हा टप्पा पूर्ण केला. या टप्प्यासाठी एकूण ४१० सेगमेन्ट रिंग्ज वापरण्यात आल्या. सतराव्या टप्प्यानंतर पॅकेज ७ अंतर्गत ७.०७९ किमी मार्गिकेपैकी ५.८७ किमी भुयारीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. पॅकेज ७ मधील भुयारीकरणाचा हा सहावा टप्पा असून लवकरच आणखी दोन टप्पे पूर्ण होणार आहेत.