मुंबई : सातवीच्या विद्यार्थ्याने आपल्या शिक्षिकेची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना शिवाजीनगरमध्ये मंगळवारी घडली. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करीत, शिवाजीनगर पोलिसांनी विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. हत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.आयेशा अस्लम हुसीये (३०) असे मृत शिक्षिकेचे नाव आहे. त्या घटस्फोटीत असून, त्यांना दोन मुले आहेत. घटस्फोटानंतर गेल्या दोन-अडीच वर्षांपासून त्या शिवाजीनगर येथील एकमजली घरात एकट्याच राहत होत्या. सायंकाळच्या वेळेस त्या दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शिकवणी घेत होत्या. सोमवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे शिकवणी झाल्यानंतर सर्व विद्यार्थी घरी निघाले.थोड्या वेळाने आरोपी विद्यार्थी पुन्हा शिक्षिकेच्या घरी आला. घरातून बाहेर पडताना त्याच्या हातातील चाकू पाहून स्थानिकांना संशय आला. त्यांनी घराकडे धाव घेतली, तेव्हा आयेशा या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसून आल्या. त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेले असता मृत घोषित करण्यात आले. घटनेची वर्दी लागताच शिवाजीनगर पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी याबाबत विद्यार्थ्याला ताब्यात घेत चौकशी सुरू केली.आरोपी विद्यार्थ्याच्या आईने आयेशा यांच्याकडून घरखर्चासाठी दोन हजार रुपये उसने आणण्यास सांगितले होते. मात्र, शिक्षिकेने त्याला पैसे देण्यास नकार दिला. याच रागात शिकवणीवरून तो घरी आला. घरातून चाकू घेवून पुन्हा आयेशा यांच्या घरी गेला. पैसे न दिल्याच्या रागात त्यांच्या पोटात आणि पाठीवर चाकूने वार करून पुन्हा घरी आल्याची त्याच्या जबाबातून समोर येत आहे. मात्र, त्याच्या जबाबात तफावत असल्याने यामागे अन्य कुणाचा तरी हात असल्याचा संशय तपास पथकाला आहे. त्यानुसार, खबऱ्यांच्या मदतीने पोलीस अधिक तपास करत आहेत.>२००९ मध्येझाली होती वडिलांची हत्या२००९ मध्ये आयेशा यांच्या वडिलांची घराच्या वादातून दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपीला अटकझाली होती.>हत्येची सुपारीआयेशा यांचे याच परिसरातील एका प्राध्यापकासोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती समोर येत. आयेशा यांनी प्राध्यापकाची मालमत्ता बळकावल्याचा संशय आहे. त्यातूनच आयेशा यांच्या हत्येसाठी ५ हजार रुपयांची सुपारी देत, काटा काढल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे. या दिशेनेही पोलिसांकडून तपास सुरू आहे. यात प्राध्यापकाच्या नातेवाइकांकडे पोलीस चौकशी करत आहेत.
सातवीच्या विद्यार्थ्याने केली शिक्षिकेची हत्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 6:18 AM