मुंबई : ‘लोकमत’ रक्तदानाच्या महायज्ञात ७७ बाटल्या रक्त संकलन करणारे हेलपिंग हँडस अँड असोसिएशनचे प्रमुख संजय मोदी हे लवकरच प्लेटलेट्स डोनेशनची पंच्याहत्तरी पार करण्याच्या तयारीत आहेत. त्यांचा हा निर्धार त्यांनी रविवारी या रक्तदान शिबिराच्या वेळी बोलून दाखवत तरुणांना प्रोत्साहित केले.
मोदी यांनी कॅन्सर रुग्णांसाठी अद्याप ७४ वेळा प्लेटलेट्स डोनेट केले आहेत. टाटा मेमोरियल रुग्णालयात हे डोनेशन करताना त्यांनी शेकडो लोकांना यासाठी प्रेरित केल्याने कोरोना काळातही त्यांचे हे मिशन थांबले नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करत प्लेटलेट्स डोनेट करण्याची इच्छा असणाऱ्याच्या त्यांनी स्वतः घरी जात त्यांना रुग्णालयात सोडणे आणि प्लेटलेट्स डोनेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पुन्हा घरी पोहोचविण्याचे कार्य हाती घेतले होते. त्यामुळे कोरोना काळात प्लेटलेट्सची गरज असणाऱ्या रुग्णांची बऱ्यापैकी गैरसोय वाचली.
‘लोकमत’च्या 'रक्ताचं नातं' या मागाठाणेच्या सिद्धार्थनगर परिसरात त्यांच्या इंप्रिंट कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कार्यालयासमोर आयोजित शिबिरांतर्गत रक्तदान करणाऱ्यांना कोरोना काळात अत्यंत उपयुक्त असे वेपोरायझर भेट म्हणून देण्यात आले. जवळपास ९१ जणांनी 'लोकमत'च्या या शिबिरात नावनोंदणी केली होती. दरम्यान, लवकरच मोदी त्यांचे पंच्याहत्तरवे प्लेटलेट्स दान पूर्ण करतील, असा निर्धार त्यांनी केला असून यासाठी पत्नी फाल्गुनी यांनी देखील त्यांना पूर्ण समर्थन दिले आहे.
फोटो ओळ : कॅन्सर रुग्णांसाठी प्लेटलेट्स डोनेट करताना उजव्या बाजूला संजय मोदी.