Join us  

पनवेलमध्ये सत्तर टक्के नालेसफाई

By admin | Published: May 27, 2014 12:36 AM

आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमानुसार पनवेल नगरपालिकेने मान्सूनपूर्व तयारी गेल्या काही दिवसांपासून सुरू केली आहे

पनवेल : आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमानुसार पनवेल नगरपालिकेने मान्सूनपूर्व तयारी गेल्या काही दिवसांपासून सुरू केली आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा याकरिता आरोग्य विभागाने नालेसफाई हाती घेतली असून सत्तर टक्के काम पूर्ण झाले आहे. या महिन्याच्या शेवटी सर्व नाले कचरा व गाळमुक्त होतील असा विश्वास पालिकेच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला. या कामावर नगराध्यक्षा चारूशीला घरत यांची करडी नजर असून कामात कसूर राहू नये यासाठी त्या स्वत: रस्त्यावर उतरल्या आहेत. खाडी किनारी आणि गाढी नदीच्या बाजूला असलेल्या पनवेल परिसरात पावसाळयात अनेक ठिकाणी पाणी साचते. त्यातच काही ठिकाणी समुद्र सपाटीपासून खाली असल्याने त्या ठिकाणी कमी पावसातही पाणी साचते. विशेषत: बावन बंगला, सहस्त्रबुध्दे हॉस्पिटल, सोसायटी परिसरात अशी परिस्थिती उद्भवते. खाडीलगत असलेले कच्छी मोहल्ला, कोळवाडी या भागात पुरजन्य परिस्थिती निर्माण होते. पाणी वाहून नेणारे नाले प्लास्टिक आणि इतर कचरा जावून तुंबतात. त्याचा परिणाम पावसाळ्यात दृष्टिक्षेपास पडत असल्याने २६ जुलै २००५ रोजी पनवेलकरांनी अनुभवले. २५ जुलै रोजीच पनवेल पाण्याखाली आले होते तेव्हापासून पनवेल नगरपालिका मान्सूनपूर्व काळात शहरातील सर्व नाल्यांची सफाई करते. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होऊन परिस्थिती नियंत्रणात ठेवता येते. यावर्षीही प्रशासनाने खाजगी ठेकेदार आणि पालिका कर्मचार्‍यांच्या माध्यमातून नालेसफाईचे काम हाती घेतले आहे. ज्या ठिकाणी मनुष्यबळाने शक्य नाही तेथे जेसीबी आणि पोकलेन मशिनचा वापर नाल्यातील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. पटेल मोहल्ला, कच्छी मोहल्ला ,एमजी रोड परिसरातील नाले कचरा मुक्त करण्यात आले आहेत. आरोग्य सभापती अनिल भगत यांच्यावर सत्ताधार्‍यांनी ही जबाबदारी सोपवली आहे. कुठे गाळ राहून पाणी तुंबू नये याकरिता अगोदरच खबरदारी घेतली जात आहे. भगत यांनी सोमवारी सर्व सफाई कामगारांची बैठक घेऊन आपत्ती व्यवस्थापनाचे महत्व पटवून दिले त्याचबरोबर नालेसफाईवर विशेष लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर आज सकाळी नगराध्यक्षा चारूशीला घरत यांनी आरोग्य निरीक्षक दिलीप कदम, शैलेश गायकवाड आणि दौलत शिंदे यांच्या समवेत नालेसफाईची पाहणी केली. नगराध्यक्षांनी प्रत्येक विभागात जावून साफसफाई चांगली होते की नाही याची तपासणी केली. त्यांनी मिरची गल्ली येथील नाल्याजवळ सुरक्षिततेसाठी जाळी बसविण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर ज्या नाल्याची साफसफाई झाली नाही ते त्वरित करून घ्या असे आदेशही त्यांनी अधिकार्‍यांना दिले. (वार्ताहर)