मुंबई - सत्तर वर्षांच्या ज्येष्ठ महिलेने केलेल्या अवयवदानातून पाच जणांना जीवदान मिळाले आहे. दरम्यान, या महिलेने टिश्यू, कॉर्निया, यकृत, दोन्ही मूत्रपिंड दान केले आहेत. या महिलेवर ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरु होते. पण, तिला १५ सप्टेंबर रोजी डॉक्टरांनी मेंदूमृत घोषित केले. यंदाच्या वर्षांतील मुंबईतील २९ वे यशस्वी अवयवदान असल्याची माहिती मुंबई जिल्हे अवयव प्रत्यारोपण समितीने दिली आहे.मुंबईत अवयवदानाच्या चळवळीला आता हळुहळू गती येऊ लागली आहे.
उपचारादरम्यान ब्रेन डेड घोषित केल्याने या ७० वर्षीय महिलेच्या कुटुंबीयांनी तिचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. रुग्णाचे उपचार करणारे डॉक्टर, अतिदक्षता विभागाचे डॉक्टर आणि प्रत्यारोपण समन्वयक यांनी अवयवदानासाठी कुटुंबाचे समुपदेशन केले आणि कुटुंबाने अवयवदानासाठी संमती दिली.
त्यानुसार, या महिलेचे अवयव दान करण्यात आले. अवयवांचा उपयोग रुग्णालयात अवयवांच्या प्रतिक्षेत असणाऱ्या रुग्णांसाठीच करण्यात आला असल्याची माहिती मुंबई जिल्हे अवयव प्रत्यारोपण समितीने दिली आहे.