अनेक शाळांनी नाकारलं, तिनं आव्हान स्वीकारलं; 90% गुणांसह नेत्रदीपक यश मिळवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 09:28 AM2019-05-10T09:28:57+5:302019-05-10T09:30:43+5:30

सेरेब्रल पाल्सीनं ग्रस्त असलेल्या ममता नायकची संघर्षगाथा

Several schools refused to admit girl with cerebral palsy today she scored 90 4 percent in CBSE Class 10 exams | अनेक शाळांनी नाकारलं, तिनं आव्हान स्वीकारलं; 90% गुणांसह नेत्रदीपक यश मिळवलं

अनेक शाळांनी नाकारलं, तिनं आव्हान स्वीकारलं; 90% गुणांसह नेत्रदीपक यश मिळवलं

googlenewsNext

मुंबई: सेरेब्रल पाल्सीनं ग्रस्त असल्यानं अनेक शाळांनी प्रवेश नाकारलेल्या ममता नायकनं दहावीच्या परीक्षेत 90.4 टक्के गुण मिळवत नेत्रदीपक यश मिळवलं. सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यानंतर सर्वत्र ममता नायकच्या कामगिरीचं कौतुक होत आहे. ममताच्या यशाचा अभिमान वाटत असल्याची भावना तिच्या शाळेतल्या शिक्षकांनी व्यक्त केली आहे.

अंधेरीच्या राजहंस विद्यालयात शिकणाऱ्या ममता नायकनं 90.4 टक्के गुण मिळवले. सेरेब्रल पाल्सीचा सामना करणाऱ्या व्यक्तीनं चालताना कायम आधार लागतो. त्यांना नीट लिहिता आणि बोलतादेखील येत नाही. या सगळ्या अडचणींवर ममतानं जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मात केली. अभ्यास आणि फिजिओथेरपी यांच्यात संतुलन साधत तिनं 500 पैकी 452 गुण मिळवले. सेरेब्रल पाल्सीमुळं तिला गणिताचा पेपर न देण्याची सवलत देण्यात आली होती. तर इतर विषयाची परीक्षा तिनं तोंडी दिली. 

अडचणींमुळे खचून न जाता जिद्दीनं त्यांचा सामना करणारी ममता सर्वांसाठीच प्रेरणादायी असल्याची भावना शाळेच्या मुख्याध्यापिका दीपशिखा श्रीवास्तव यांनी व्यक्त केली. ममता अतिशय कष्टाळू मुलगी आहे. ती सदैव आनंदी असते. तिच्या चेहऱ्यावर कायम हास्य असतं. तिच्यासारख्या मुलीनं आमच्या शाळेत शिक्षण घेतलं ही आमच्यासाठी आनंदाची बाब असल्याचं त्या म्हणाल्या. 

ममताच्या यशाबद्दल तिची आई रुपाली नायक यांनी शाळेतील सर्व शिक्षकांचे आभार मानले. शाळेतल्या शिक्षकांनी केलेल्या सहकार्यामुळे ममता कधी कोचिंग क्लासची गरज भासली. नाही, असं रुपाली यांनी सांगितलं. 'शाळेनं आम्हाला खूप सांभाळून घेतलं. आम्ही अनेकदा लवकर निघायचो. उशिरा शाळेत यायचो. कित्येकदा मी वर्गात थांबायचे. शिक्षकांना शंका विचारायचे. शाळेनं, शिक्षकांनी कायमच आम्हाला साथ दिली,' अशा भावना रुपाली यांनी बोलून दाखवल्या. 
 

Web Title: Several schools refused to admit girl with cerebral palsy today she scored 90 4 percent in CBSE Class 10 exams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.