‘एल्फिन्स्टन’च्या मार्गावर अनेक स्थानके, दादर, कुर्ला, मशीद, करी रोड, चिंचपोकळी स्थानकांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 01:05 AM2017-10-01T01:05:27+5:302017-10-01T01:05:31+5:30
एल्फिन्स्टन रोड पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांवरील अरुंद पुलांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यामध्ये प्रामुख्याने दादर, कुर्ला, मशीद, करी रोड, चिंचपोकळी, लोअर परळ या स्थानकांचा समावेश आहे.
मुंबई : एल्फिन्स्टन रोड पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांवरील अरुंद पुलांचा मुद्दा
ऐरणीवर आला आहे. यामध्ये प्रामुख्याने दादर, कुर्ला, मशीद, करी रोड, चिंचपोकळी, लोअर परळ या स्थानकांचा समावेश आहे.
पादचारी पुलांचा अभाव, अरुंद जिने, प्रवासी संख्येच्या तुलनेत कमी
प्रवेशद्वारे आणि अरुंद फलाट
यामुळे मुंबईतील अनेक रेल्वे स्थानके
अशी आहेत; जेथे चेंगराचेंगरीसारख्या घटना घडू शकतात, अशी भीती व्यक्त
होत आहे.
मुंबईतील महत्त्वाचे रेल्वे स्थानक असलेल्या मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील दादर स्थानक हे गर्दीच्या अव्यवस्थापनाचे प्रमुख उदाहरण आहे. दादर स्थानकातील फलाटांना आणि मध्य व पश्चिम मार्गाला जोडणारा मधला पूल अरुंद आहे आणि असे अजून दोन पूल आहेत; आणि त्या पुलांवर जाण्यासाठी असणारे जिनेही चिंचोळे आहेत.
दादर मध्य रेल्वे मार्गावरील स्थानकाचीही परिस्थिती अत्यंत बिकट आहे. फलाट क्रमांक १ आणि २ वर
नेहमी गर्दी असते. ठाणे-डोंबिवलीच्या दिशेने जाणाºया धिम्या गाड्यांसाठी असलेले फलाट इतर फलाटांच्या
तुलनेत दक्षिणेकडे आहे. त्यामुळे जिना
रुंद असला तरी मुख्य पुलाशी जोडणारा एकच मार्ग असल्याने त्यावर प्रचंड गर्दी होते.
कुर्ला येथे हार्बर आणि मध्य रेल्वे मार्गाला जोडणाºया कुर्ला स्थानकावरून रोज लाखो प्रवासी प्रवास करतात. मात्र या स्थानकातून नेहरू नगर बस आगाराकडे जाण्यासाठी एकच पूल असल्याने या पुलावर गर्दी उसळते. त्यातच याच पुलाच्या बाजूला पालिकेचाही पादचारी पूल असून, दोन्ही पुलांचा प्रवेश एकाच ठिकाणी आहे. सहा महिन्यांपूर्वीच
रेल्वेने या ठिकाणी एक नवीन पूल बांधला आहे. मात्र तो फलाटाच्या टोकाला असल्याने त्याचा वापर फार कमी लोक करतात.
करी रोड, चिंचपोकळी आणि लोअर परळ या स्थानकांवरही सकाळी व सायंकाळी गर्दी असते. रेल्वे स्थानकावरून मुख्य रस्त्यावर जाण्यासाठी तीनही स्थानकांवर एकच अरुंद जिना आहे. गणेशोत्सवात या तीनही स्थानकांवर मोठी गर्दी उसळते. तेव्हा दिवसरात्र या ठिकाणी चेंगराचेंगरी होते, विशेष पोलीस व्यवस्थाही करावी लागते.
चाकरमान्यांची सर्वांत जास्त गर्दी असलेले मुंबईतील स्थानक म्हणजे
मशीद. या स्थानकावर दिवसभर गर्दी असते. स्थानकावरून बाहेर पडण्यासाठी खूपच चिंचोळे पूल आणि चिंचोळे जिने आहेत. चेंगराचेंगरीचा सर्वांत जास्त धोका या स्थानकावर आहे.