बरे झाल्यानंतर सतावतेय पाठदुखी; ओमायक्रॉनच्या संसर्गानंतरही बरे होण्याची प्रक्रिया जटिल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 07:32 AM2022-01-12T07:32:30+5:302022-01-12T07:40:25+5:30
ओमायक्रॉनचा सरासरी मुक्काम आणि शरीरावर होणारा संसर्ग याबाबतही मुंबईतील डॉक्टरांनी काही प्रमुख निरीक्षणे मांडली आहेत.
मुंबई : ओमायक्रॉनचा संसर्ग हा सौम्य आजार म्हणून समोर येत असला तरीही आता ओमायक्रॉनच्या संसर्गातून बरे झाल्यानंतर नवीन लक्षणे समोर आली आहेत. दक्षिण आफ्रिकेत ज्या पद्धतीची लक्षणे ओमायक्रॉनच्या निमित्ताने समोर आली होती, तशीच लक्षणे ही मुंबईतील रुग्णांमध्ये दिसून आली आहेत.
ओमायक्रॉनचा सरासरी मुक्काम आणि शरीरावर होणारा संसर्ग याबाबतही मुंबईतील डॉक्टरांनी काही प्रमुख निरीक्षणे मांडली आहेत. ओमायक्रॉनच्या बहुतांश रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. पण अनेक रुग्णांनी अंगदुखी तसेच दीर्घकाळ अशा अशक्तपणाच्या तक्रारी केल्या आहेत. त्यामध्ये सर्वाधिक पाठदुखीची तक्रार आहे.
विक्रोळी येथे राहणाऱ्या संगीता (नाव बदललेले, वय ३२) या महिलेला सुरुवातीला घशाच्या खवखवीची लक्षणे जाणवली. त्यानंतर लगेचच थंडी आणि तापही आला. त्यासोबतच पाय दुखणे आणि पाठदुखीचाही त्रास तिला होत होता. संपूर्ण शरीरातील दुखणे जाणवत होते. अशातच पॅरासिटामॉल खाल्ल्यानंतरही वेदनाशामक गरज भासली. सततच्या उपचारानंतर तिसऱ्या दिवशी थोडासा दिलासा मिळाला, अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे. तर अंधेरीच्या एका महिलेनेही सुरुवातीच्या लक्षणांमध्ये तापासह काही लक्षणे आढळली असल्याचे सांगितले. पण, महिलेने वेळीच औषधे घेतल्याने ताप नियंत्रणात आला. पण याआधी कधीही पाठदुखी अनुभवली नाही, अशा प्रकारचे दुखणे मी या दिवसांमध्ये अनुभवल्याचा अनुभव महिलेने शेअर केला आहे.
दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉनच्या लक्षणांबाबत झालेल्या अभ्यासानुसार घशाची खवखव हे सुरुवातीच्या काळातील सर्वात महत्त्वाचे असे लक्षण म्हणून समोर आले होते. तसेच कोरडा कफ, पाठीच्या खालच्या भागात दुखणे, नाकाला सूज येणे हीदेखील लक्षणे होती. मुंबईतही डॉक्टरांनी सांगितलेल्या लक्षणांमध्ये ताप आणि डोकेदुखी ही लक्षणे दिसून आली. त्यापाठोपाठ काही रुग्णांमध्ये अशक्तपणा तसेच मरगळल्यासारखे वाटणे, यांसारखी लक्षणे दिसून आली आहेत. जवळपास सातव्या ते आठव्या दिवसांपर्यंत ही लक्षणे दिसून येतात, अशी मुंबईकरांच्या लक्षणांमधील माहिती आहे.
गॅसमुळेही दुखणे शक्य
अनेकदा औषधांमुळे शरीरात निर्माण होणाऱ्या गॅसमुळेही शरीराच्या पाठीच्या खालच्या भागात दुखणे सुरू होते. त्यामध्ये (वेदनाशामक) अँटिबायोटिक्सचा मोठा वापर असल्यानेच अनेक रुग्णांमध्ये हे लक्षण आढळून आले आहे. पण, बहुतांश रुग्णांमध्ये पाचव्या दिवशी आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
- डॉ. शैलेश व्होरा, अस्थिरोगतज्ज्ञ