Join us

राज्यात यंदा कडाक्याची थंडी; नोव्हेंबरमध्ये मुंबई अन् ठाणे गारेगार होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2022 8:48 AM

उबदार कपडे पुन्हा बाहेर काढावे लागणार आहेत. नोव्हेंबर महिन्याचा विचार करता धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत दरवर्षी पडणाऱ्या सरासरी पावसापेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबई : मुंबईसहमहाराष्ट्राला झोडपून काढणारा पाऊस केव्हाच हद्दपार झाला असून, आता थंडी वाढणार आहे. हवामान तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार नोव्हेंबर महिन्यात पाऊस ओढ देणार असतानाच कडाक्याची थंडी पडणार आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत सरासरीच्या तुलनेत किमान तापमान खाली घसरणार आहे. त्यामुळे यंदाचे वर्षे पुन्हा एकदा हुडहुडीचे ठरणार आहे. 

उबदार कपडे पुन्हा बाहेर काढावे लागणार आहेत. नोव्हेंबर महिन्याचा विचार करता धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत दरवर्षी पडणाऱ्या सरासरी पावसापेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. जळगाव, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, रत्नागिरी, सातारा, सांगली या जिल्ह्यांत दरवर्षी पडणाऱ्या सरासरी पावसापेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे, थोडक्यात नगण्य म्हणजे जवळपास पाऊस पडण्याची शक्यता नाही. सोलापूर व उर्वरित मराठवाडा व संपूर्ण विदर्भातील १८ जिल्ह्यांत मात्र दरवर्षीच्या नोव्हेंबरमधील सरासरी पावसापेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

पहाटे भरणार हुडहुडी

महाराष्ट्रात दुपारी ३ वाजेचे कमाल तापमान हे दरवर्षी असणाऱ्या सरासरी कमाल तापमानापेक्षा अधिक असेल. ही शक्यता ५० टक्के आहे. मात्र खूप ऊन पडणार नसले तरी दुपारचे तापमान उबदार असणार आहे. मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर व विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांत पहाटे ५ वाजेचे किमान तापमान  नोव्हेंबर महिन्यात दरवर्षी असणाऱ्या सरासरी किमान तापमानापेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. थोडक्यात किमान तापमान हे सरासरीपेक्षा खूप खालावण्याची शक्यता आहे. याचा अर्थ तेथे चांगलीच थंडी जाणवणार आहे. उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रातही पहाटे पाचचे किमान  तापमान हे नोव्हेंबर महिन्यात दरवर्षीच्या सरासरी किमान तापमानापेक्षा कमीच असण्याची  शक्यता आहे. त्यामुळे येथेही थंडी जाणवणार आहे.

महाराष्ट्रासाठी पुढील आठवडाभर पावसाचा कोणताही अंदाज नाही. ईशान्येकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे पुढील आठवडाभर महाराष्ट्रात कमी-अधिक प्रमाणात थंडी जाणवणार आहे. - माणिकराव खुळे, निवृत्त हवामान अधिकारी

टॅग्स :तापमानमहाराष्ट्रमुंबई