लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वायुप्रदूषणाचे आरोग्यविषयक आणि आर्थिक परिणाम यापूर्वीच समोर आले आहेत. आता वायुप्रदूषणाचा परिणाम भारतातील मोसमी पावसावरही होत असल्याचे संशोधनातून आणि तज्ज्ञांच्या अभ्यासातून स्पष्ट होत असून, वातावरणातील प्रदूषणामुळे केवळ पाऊस कमी होत नसून यामुळे टोकाची वातावरणीय स्थितीही उद्भवू शकते. वाढत्या वायुप्रदूषणामुळे तीव्र गारपीट, मेघगर्जना, न थांबणारा पाऊस यात वाढ झाली आहे.
वायुप्रदूषणामुळे मोसमी पावसाचे स्वरूप अनियमिततेकडे झुकते आहे. वायुप्रदूषणामुळे एखाद्या वर्षी दुष्काळ तर पुढील वर्षी अतिवृष्टी असे लहरी स्वरूप पाऊस धारण करू शकतो. ही परिस्थिती पावसाच्या कमी झालेल्या प्रमाणापेक्षा अधिक चिंतेची आहे; कारण यामुळे अनपेक्षित घटनांमध्ये वाढ होईल. संयुक्त राष्ट्रांच्या इंटरगव्हर्नमेंटलपॅनेल ऑन क्लायमेटचेंजच्या अहवालातही याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. मानवी कृत्यांमधून निर्माण होणाऱ्या प्रदूषणकारी घटकांमुळे उन्हाळ्यातील पर्जन्यमानात घट झाली आहे.
१९५१ ते २०१९ या काळात नैर्ऋत्य मोसमी पावसाच्या सरासरीमध्ये घट झाली आहे. ही परिस्थिती येत्या काही वर्षांत कायम राहणार असून, यात वायुप्रदूषणाचा मोठा वाटा असेल. वायुप्रदूषणामुळे देशभरात नैर्ऋत्य मोसमी पावसाचे प्रमाण १० ते १५ टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पावसाच्या प्रमाणात ५० टक्के कमतरताही येऊ शकते. वायुप्रदूषणाचा परिणाम पावसाचे आगमन आणि गतिशीलता यांच्यावरही होऊ शकतो. वायुप्रदूषणामुळे भूपृष्ठाचे तापमान अपेक्षित मर्यादेपर्यंत वाढू शकत नाही. वातावरणातील प्रदूषकांच्या अस्तित्वामुळे भूपृष्ठाची तापमान वाढ कमी प्रमाणात होते.