जलवाहिनी फुटल्याने मीरा-भाईंदरमध्ये तीव्र पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:13 AM2021-01-13T04:13:35+5:302021-01-13T04:13:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : देखभालीकरिता २४ तासांचा शटडाऊन ३६ तासांवर गेल्याने पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त असतानाच, शनिवारी सायंकाळी ...

Severe water shortage in Mira Bhayandar due to bursting of aqueduct | जलवाहिनी फुटल्याने मीरा-भाईंदरमध्ये तीव्र पाणीटंचाई

जलवाहिनी फुटल्याने मीरा-भाईंदरमध्ये तीव्र पाणीटंचाई

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मीरा रोड : देखभालीकरिता २४ तासांचा शटडाऊन ३६ तासांवर गेल्याने पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त असतानाच, शनिवारी सायंकाळी शिळफाटा येथे जलवाहिनी फुटल्याने मीरा-भाईंदरकरांना तीव्र पाणीटंचाई सहन करावी लागण्याची शक्यता आहे.

मीरा-भाईंदर शहरास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून रोज १०५ ते ११० दशलक्ष लीटर, तर स्टेम प्राधिकरणाकडून ८६ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून जांभूळ येथील बारवी जलशुद्धीकरण केंद्राच्या जलवाहिनीची तातडीची देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने, गुरुवार, ७ जानेवारीच्या मध्यरात्री १२ वाजल्यापासून शुक्रवार, ८ जानेवारीच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत २४ तासांचा शटडाऊन घेण्यात आला होता, परंतु प्रत्यक्षात जलवाहिनी दुरुस्तीचे काम शनिवारी दुपारी दीड वाजेपर्यंत रखडल्याने शटडाऊनचा कालावधी ३६ तासांवर गेला.

शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास पाणीपुरवठ्याला सुरुवात झाल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला होता, परंतु सायंकाळी ६.५० वाजता पुन्हा शिळफाटा, शालू हॉटेलजवळ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची पाणीपुरवठा करणारी १,५९० मिमी. व्यासाची मुख्य जलवाहिनी फुटली. त्यामुळे मीरा-भाईंदर शहरास एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा खंडित झाला. जलवाहिनी फुटल्याने मीरा-भाईंदर शहराला केवळ स्टेम प्राधिकरणाचेच पाणी मिळू शकणार आहे. परिणामी, शहरास कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करून सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे यांनी केले आहे.

Web Title: Severe water shortage in Mira Bhayandar due to bursting of aqueduct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.