वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी
By admin | Published: March 9, 2017 03:44 AM2017-03-09T03:44:08+5:302017-03-09T03:44:08+5:30
सुरक्षा व अवाजवी भाडे याबाबत येणाऱ्या तक्रारीनंतर अॅप बेस अशा खासगी प्रवासी वाहनांवर परिवहन विभागाकडून निर्बंध लादत महाराष्ट्र सिटी टॅक्सी योजना लागू केली.
मुंबई : सुरक्षा व अवाजवी भाडे याबाबत येणाऱ्या तक्रारीनंतर अॅप बेस अशा खासगी प्रवासी वाहनांवर परिवहन विभागाकडून निर्बंध लादत महाराष्ट्र सिटी टॅक्सी योजना लागू केली. परंतु खासगी प्रवासी वाहनांची असलेली ‘दादागिरी’ आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरत असलेली सरकारी यंत्रणा एका घटनेतून समोर आली. खासगी प्रवासी वाहनाच्या धडकेत खार येथे राहणाऱ्या एका महिलेच्या पतीचा अपघात झाला आणि यात गंभीर जखमी झाल्याने तीचा पती कोमात गेला. नाहेद अली (४0) असे महिलेचे नाव असून, पतीचे नाव रेझा आबिद अली (४३) असे आहे. मात्र या घटनेनंतरही हार न मानता नाहीद अलीकडून गेल्या चार महिन्यांपासून न्यायासाठी लढा सुरू ठेवला आहे. पोलिसांत तक्रार दाखल करतानाच नुकसानभरपाई मिळावी यासाठी थेट परदेशात असलेल्या उबेर कंपनीच्या मालकालाच पत्र धाडले आहे.
खार पश्चिम येथे रेझा आबिद हे आपली आई, पत्नी नाहेद, बहीण तसेच दोन मुलांसह राहतात. रेझा आबिद हे महालक्ष्मी येथील फोर सिझन आॅटोमोबाईलमध्ये कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत आहेत. १४ नोव्हेंबर रोजी रेझा हे संध्याकाळी आपल्या कार्यालयातून निघून बाइकने खार येथील घरी जात होते. वांद्रे येथील जरीमरी मंदिराजवळ येताच समोरून येणाऱ्या एका खासगी प्रवासी वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की त्यात रेझा हे गंभीर जखमी झाले आणि त्यांना घटनास्थळी उपस्थित एका वाहतूक पोलिसाने अन्य लोकांच्या सहकार्याने भाभा रुग्णालयात दाखल केले. यात रेझा यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यामुळे ते कोमात गेले. रेझा यांची पत्नी नाहीद अली यांनी आपल्या पतीला यातून बाहेर काढण्यासाठी गेल्या चार महिन्यांपासून धडपड सुरू केली आहे. रेझा यांच्यावर वांद्रे येथील खासगी रुग्णालयात मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली असून, आतापर्यंत आठ शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. त्यासाठी जवळपास ६0 लाख रुपये खर्च आला आहे.
यासंदर्भात नाहेद यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, उबेरच्या वाहनाने दिलेल्या धडकेत माझे पती गंभीर जखमी झाले आणि त्यानंतर कोमात गेले. ज्या वेळी घटना घडली, त्या वेळी एका वाहतूक पोलिसाने अन्य लोकांच्या साहाय्याने रेझा यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याची माहिती मला जेव्हा मिळाली तेव्हा तत्काळ रुग्णालयात धाव घेतली आणि ही घटना पाहणाऱ्या वाहतूक पोलिसानेही अपघात पाहिल्याची माहिती दिली. वांद्रे पोलिसांत तक्रारही दाखल केली गेली. मात्र त्यातून उबेरचे नाव वगळण्यात आले. महत्त्वाची बाब म्हणजे ज्या मार्गाने माझे पती गेली १० वर्षे येत आहेत त्याच मार्गावर झालेल्या अपघाताने मला धक्काच बसला आहे. यात त्यांची कोणतीही चूक नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनीही मला सांगितले. उबेरची गाडी ज्या मार्गाने येत होती तेथून येण्यास मनाई असतानाही ती गाडी येत होती. मला न्यायाची अपेक्षा असून, त्यासाठी मी उबेर कंपनीच्या भारतातील आणि सॅन फ्रॅन्सिस्को येथील मालकाला थेट पत्रच लिहून नुकसानभरपाई मागितली आहे. मला न्याय मिळावा अशी अपेक्षा यातून व्यक्त केली आहे. अजूनही कोणाकडून मदत व प्रतिसाद मिळालेला नाही.
नोव्हेंबर महिन्यात रेझा अलीचा अपघात घडला. यात प्रथम आम्हीच स्वत:हूनच तक्रार दाखल करून घेतली. चालकाविरोधात गुन्हा दाखल करतानाच त्याला अटकही केली. तसेच गाडीच्या मालकाविरोधातही कारवाई करण्यात आली. उबेर कंपनीचा याच्याशी काहीएक संबंध नसून चालक आणि गाडीचा मालक यांच्याविरोधातच कारवाई होऊ शकते. महत्त्वाची बाब म्हणजे आम्ही स्वत:हून तक्रार दाखल केल्यानंतर नाहेद अली यांनी नंतर येऊन त्याची माहिती घेतली. त्यांनी सुरुवातीला तक्रार दिली नव्हती. त्यामुळे यात उबेरचे नाव नाही आणि त्याचे नाव असण्याचा
प्रश्नच नाही.
- पंडित ठाकरे, वांद्रे पोलीस
ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
- उबेर कंपनीच्या प्रवक्त्याशी संपर्क साधला असता, आम्ही नाहेद अली यांच्या दु:खात सहभागी आहोत; तसेच त्यांचे पती रेझा हे लवकरात लवकर बरे व्हावेत अशी आम्ही अपेक्षा करतो. अशा परिस्थितीत आम्ही तपास यंत्रणांनाही सहकार्य करण्यास तयार आहोत.
नाहेद अली यांनी उपस्थित केलेले प्रश्न
- मोबाइलवर बोलताना वाहनचालक आढळल्यास त्यांना वाहतूक पोलिसांकडून दंड आकारण्यात येतो. मग उबेर कंपनीच्या चालकांकडून तर समोर मोबाइल ठेवून गाडी चालवली जाते.
- हे धोकादायक असून, त्यांना परवानगी का?
- परिवहन विभाग व वाहतूक पोलिसांकडून त्यांच्यावर कठोर कारवाई का केली जात नाही?