शिवडी रुग्णालयातून बालरुग्णांना हाकलले! पालकांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 05:30 AM2018-09-28T05:30:01+5:302018-09-28T05:30:15+5:30
रुग्णांच्या पालकांनी तक्रार केल्याचा राग मनात धरून सात बालरुग्णांना रुग्णालयाबाहेर हाकलल्याचा प्रकार शिवडी क्षयरोग रुग्णालयात शुक्रवारी उघडकीस आला.
मुंबई - रुग्णांच्या पालकांनी तक्रार केल्याचा राग मनात धरून सात बालरुग्णांना रुग्णालयाबाहेर हाकलल्याचा प्रकार शिवडी क्षयरोग रुग्णालयात शुक्रवारी उघडकीस आला. गुरुवारी सकाळी सातही पालकांनी मुलांसह माहीम दर्गा परिसरात आंदोलन केले. अखेरीस पोलिसांनी त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल केले.
या रुग्णांमध्ये मंजू पठाण (११), आथिया खान (७), पल्लवी झसरे (१२), सिमरन शेख (६), लक्ष्मी वाल्मीकी (१0), रक्षा सेठ (६) या लहान मुलांवर वॉर्ड क्रमांक एकमध्ये उपचार सुरू होते. या मुलांना किमान सहा महिने क्षयरोगावर उपचार करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. परंतु, आता हे रुग्ण बरे झाले आहेत, त्यामुळे त्यांना उपचारांची आवश्यकता नसल्याचे सांगत परिचारिकांनी बाहेर काढल्याची माहिती पालकांनी दिली.
हा प्रकार रविवारी घडला, त्याच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी याविषयी पालकांनी रुग्णालय प्रशासनाकडे तक्रारही केली. म्युनिसिपल मजदूर युनियनचे प्रदीप नारकर यांनी
सांगितले की, बºयाचदा या रुग्णालयातील रुग्ण वर्षानुवर्षे येथे उपचार घेत असतात. त्यात बºयाच रुग्णांची मानसिक स्थितीही बिघडते. रुग्ण उपचार सोडून जाणे हे या रुग्णालयात अनेक वेळा घडते. मात्र रविवारी घडलेल्या प्रकारात परिचारिकांची चूक नसून, रुग्ण स्वत: उपचार अर्ध्यावर सोडून निघून गेले आहेत.
डॉक्टरांनी घरी येऊन घेतली भेट
तीन महिन्यांपासून रुग्णालयात मंजूवर उपचार सुरू आहेत. मात्र वॉर्डमध्ये असताना सतत परिचारिका ओरडायच्या याविषयी रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार केल्याची माहिती मंजूच्या आईने दिली. अजून तिचे उपचार बाकी आहेत. त्यामुळे माझ्या पतींनीही डॉक्टरांची भेट घेतली. घडल्या प्रकारानंतर डॉक्टरांनी घरी येऊन मंजूची विचारपूस केल्याचे त्यांनी सांगितले.
प्रकरणाची होणार चौकशी
सातही रुग्ण रुग्णालयातून निघून गेल्याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. ललितकुमार आनंदे यांनी दिली. पालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. आय. ए. कुंदन यांनी रुग्णालयाला भेट देत रुग्णांशी असभ्य वर्तन करणाºया परिचारिका, आया यांना निलंबित करण्याच्या सूचना दिल्या. या संपूर्ण प्रकरणाबाबत चौकशी नेमण्यात आली असून, तीन दिवसांनंतर कारवाई करता येईल, अशी माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. ललितकुमार आनंदे यांनी दिली. या प्रकरणी रुग्णालयाच्या मेट्रन यांचीही वर्तणूक योग्य दिसून न आल्याने त्यांनाही नोटीस बजावण्यात येणार असल्याचे डॉ. आनंदे यांनी सांगितले.