महाडमध्ये सांडपाणी वाहिनी फुटली
By admin | Published: April 23, 2015 10:40 PM2015-04-23T22:40:36+5:302015-04-23T22:40:36+5:30
महाड औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यातील रसायनमिश्रित पाण्यावर सामायिक सांडपाणी केंद्रात प्रक्रिया केलेले सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी मंगळवारी रात्री
महाड : महाड औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यातील रसायनमिश्रित पाण्यावर सामायिक सांडपाणी केंद्रात प्रक्रिया केलेले सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी मंगळवारी रात्री चोचिंदे गावाजवळ फुटली. त्यामुळे शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. ही सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी अचानक फुटल्याने रसायनमिश्रित पाणी एका घराच्या अंगणात तर शेजारील शेतजमिनीवर पसरले, मात्र या वाहिनीचा व्हॉल्व बंद केल्याने शेतजमिनीची अधिक हानी टळली.
महाड औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यातील प्रदूषित पाणी सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात आणून त्यावर प्रक्रिया केल्यानंतर हे पाणी वाहिनीद्वारे सावित्री खाडीत सोडण्यात येते. महाड म्हाप्रळ मार्गालगत जमिनीखालून गेलेली ही वाहिनी काल रात्री अचानक फुटल्यानंतर हे सांडपाणी परिसरात पसरल्याचे दिसून आले.
सदरची वाहिनी फुटण्याचे प्रकार वारंवार घडत असून औद्योगिक विकास महामंडळाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या सांडपाणी वाहिनीला समांतर दुसरी वाहिनी टाकण्याबाबतचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. याबाबतचा पाठपुरावा केला जात आहे, मात्र या गंभीर प्रश्नाकडे महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)