लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत दररोज लाखो लिटर निर्माण होणाऱ्या सांडपाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. मुंबईतील वरळी, वांद्रे, मालाड, घाटकोपर, धारावी, भांडुप आणि वर्सोवा याठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार असून २,४६४ दश लक्ष लिटर पाण्यावर दररोज प्रक्रिया करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे सांडपाण्याचा पुन्हा वापर करणे शक्य होणार आहे.
पालिकेचे मलजल प्रक्रिया केंद्र अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे रखडला होते. पालिकेने २००२ साली याबाबतचा आराखडा तयार केला होता तर २००७ पासून या प्रकल्पाच्या अंमलबजावणीला सुरुवात केली होती. मात्र जागेची कमतरता, पर्यावरणविषयक मंजुरी, प्रकल्पाच्या प्रस्तावित जागेवरील कांदळवने, वेळोवेळी बदलणारी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची मानके यामुळे हा प्रकल्प रखडला. २०१८ साली पालिकेने प्रत्यक्ष निविदा प्रक्रियेला सुरुवात केली. तीनवेळा फेरनिविदा काढण्यात आल्या. पालिकेने अखेर मे २०२२ मध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण केली व कंत्राटदार नियुक्त केले.
अशी होईल प्रक्रिया
सध्या मुंबईतील सांडपाणी प्रक्रिया करून खाडी किंवा समुद्रात सोडले जाते, त्यामुळे काही प्रमाणात प्रदूषण होते. मलजल प्रक्रिया केंद्राद्वारे सांडपाण्यावर तीन स्तरांत प्रक्रिया केली जाईल, त्यातून बायोगॅस निर्माण होईल. या बायोगॅस ऊर्जेमुळे पर्यावरणाचा ऱ्हासदेखील कमी होणार आहे.