Join us

कोस्टल रोडलगत सांडपाणी प्रकल्प; झोपडपट्टी भागांतील सांडपाण्याचा पुनर्वापर 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 9:54 AM

स्टार्टअपना प्रोत्साहन.

मुंबई : कोस्टल रोड प्रकल्प परिसर व समुद्रालगतच्या झोपडपट्ट्यांमधील सांडपाण्याचा विसर्ग पूर्वी थेट समुद्रात होत असे; मात्र पर्यावरणपूरकतेच्या दृष्टीने मुंबई महापालिकेने कोस्टल रोडलगतच्या झोपडपट्टी परिसरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा पथदर्शी प्रकल्प हाती घेतला आहे. याअंतर्गत दररोज चार लाख ८५ हजार लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करता येणार आहे. प्रक्रिया केलेले पाणी परिसरातील शौचालये व उद्यानांमध्ये वापरण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. पालिकेच्या स्माईल इन्क्युबेशन कार्यक्रमांतर्गत नवीन स्टार्टअप्सना या प्रकल्पाद्वारे पालिकेसोबत काम करण्याची संधी दिली जाणार आहे.

कोस्टल रोडलगत विविध चार ठिकाणी झोपडपट्ट्या आहेत. त्यात टाटा उद्यानाजवळील शिवाजीनगर परिसर, महालक्ष्मी मंदिराच्या दक्षिण व उत्तर बाजूला असणारा दर्यानगर परिसर आणि ॲनी बेझंट मार्गावरील लव्हग्रोव्ह पम्पिंग स्टेशनच्या समोर असणाऱ्या मार्कंडेश्वरच्या मागील परिसराचा समावेश आहे. या चारही परिसरांमध्ये सुमारे नऊ हजार ५०० इतकी लोकवस्ती आहे. या लोकवस्तीच्या गरजेनुसार सांडपाणी प्रकल्प उभारण्याचे काम प्रगतिपथावर आहे. यापैकी शिवाजीनगर येथील प्रक्रिया केंद्राचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित तीन प्रक्रिया केंद्रांचे कामही वेगात सुरू असल्याची माहिती व्यवसाय विकास विभागाच्या प्रमुख आणि स्माईल कौन्सिलच्या संचालक शशी बाला यांनी दिली. 

हा ग्रीन एसटीपी प्रकल्प असून पारंपरिक सांडपाणी प्रक्रिया तंत्रज्ञानाच्या तुलनेत ग्रीन एसटीपी प्रकल्पाला खूप कमी वीज आणि देखभाल करण्याची आवश्यकता आहे. यामुळे केवळ झोपडपट्टीतील सांडपाण्याचा प्रश्नच सुटणार नाही, तर पुनर्संचयित क्षेत्रामध्ये बागकामासाठी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरही करता येणार आहे. तसेच प्रस्तावित प्रकल्पाच्या आजूबाजूला दुर्गंधी आणि डासांचा त्रास होणार नाही. याशिवाय प्रकल्पासाठी वापरण्यात येणाऱ्या सुंदर फुलांच्या वनस्पतींमुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडणार आहे - शशी बाला, संचालक, प्रमुख व्यवसाय विकास

उद्यान, शौचालयांसाठी होणार वापर -

‘इंटिग्रेटेड वेटलँड टेक्नॉलॉजी’च्या साहाय्याने प्रक्रिया करून स्वच्छ केलेल्या पाण्याचा उद्यान किंवा शौचालयांसाठी पुनर्वापर करणे शक्य असणार आहे.  हे प्रक्रिया केंद्र भूमिगत असल्याने ते ज्या ठिकाणी असणार आहे, त्याच्यावर झाडेही लावणे शक्य होणार आहे. प्रक्रियेदरम्यान किंवा नंतर पाण्याचा कोणताही दर्प किंवा घाण परिसरात पसरत नसल्यामुळे संबंधित जागा कायम वापरात राहू शकते.

टॅग्स :मुंबईनगर पालिका