मुंबई : सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करण्यासाठी मुंबईत सात प्रकल्प उभारण्यात येणार आहेत; मात्र महापालिकेने या प्रकल्पांसाठी अंदाजित केलेल्या खर्चापेक्षा ३० ते ६० टक्के जादा दर ठेकेदारांनी लावले आहेत. त्यामुळे सांडपाणी पुनर्वापर प्रक्रिया प्रकल्पाचे कंत्राट अद्याप देण्यात आलेले नाहीत. गेल्या दोन महिन्यांपासून चर्चेत असलेला हा प्रकल्प लांबणीवर पडला आहे. यावर मार्ग काढण्यासाठी महापालिका आता आयआयटी मुंबई यांची मदत घेणार आहे.मुंबईत दररोज दोन हजार दशलक्ष लीटर सांडपाणी तयार होत असते. हे सांडपाणी शास्त्रोक्त पद्धतीने पुनर्प्रक्रिया करून समुद्रात सोडण्यात येते; मात्र राष्ट्रीय हरित लवादाने समुद्रात सांडपाणी सोडण्याच्या मानकांमध्ये बदल केले. त्यामुळे महापालिकेने अधिक क्षमतेचे प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १५ हजार कोटींचा प्रकल्प हाती घेण्यात आला असून, सात ठिकाणी सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. मात्र धारावी, घाटकोपर, वर्सोवा येथील पुनर्प्रक्रिया केंद्रांसाठी जादा दराच्या निविदा आल्या होत्या. त्यानंतर वांद्रे, वरळी आणि भांडुप येथील केंद्रांसाठी २७ ते ३४ टक्के जादा दराने निविदा भरण्यात आल्या आहेत. या निविदा जादा दराच्या असल्या तरी वाटाघाटी करून रक्कम कमी करण्यात येईल, असा विश्वास पालिका अधिकाऱ्यांना वाटत होता; मात्र प्रशासन आणि ठेकेदार यांच्यामध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतरही मार्ग निघू शकलेला नाही. आयआयटी तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात येणार आहेवांद्रे येथे दररोज ३६० दशलक्ष लीटर, वरळी येथे ५०० दशलक्ष लीटर तर भांडुप येथे २१५ दशलक्ष लीटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. वांद्रे येथील प्रकल्पासाठी २६३१.१४ कोटी( ३४ टक्के अधिक), वरळी प्रकल्पासाठी ४०११.१६ (२७ टक्के ), तर भांडुप येथील प्रकल्पासाठी १७५५.९२ (३१ टक्के) अधिक दर ठेकेदारांनी भरले आहेत.
सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्प रखडणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2021 2:17 AM