लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मलनिस्सारण वाहिनी फुटल्याने संघर्ष नगर चांदिवली येथील मुख्य रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. आठ दिवस उलटूनही वाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती न घेतल्याने स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
आठ दिवसांपूर्वी ही मलनिस्सारण वाहिनी फुटली. मोठा उतार असल्याने मलजल थेट मुख्य रस्त्यावर वाहून येत आहे. अद्याप दुरुस्तीकाम हाती घेतले नसल्याने रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मुख्य रस्ता असल्याने येथून पादचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. त्यांना या घाणीतूनच वाट काढावी लागत आहे. तसेच रस्त्यावरील खड्ड्यांत साचलेले मलजल वाहनांच्या वर्दळीमुळे अंगावर उडल्याने चालक आणि पादचाऱ्यांत खटके उडाल्याच्या घटनाही घडल्याचे स्थानिकांनी सांगितले.
दरम्यान, हे मलजल रस्त्याशेजारच्या दुकानांतही शिरू लागल्याने दुकानदारांनी मातीचा पाट तयार करून ते दुसऱ्या दिशेला वळवले आहे. विशेष म्हणजे रस्त्यालगत गटार नसल्याने पाणी जाण्यास वाट मिळत नसल्याचे या दुकानदारांनी सांगितले. संबंधित यंत्रणांनी याकडे त्वरित लक्ष द्यावे आणि मलनिस्सारण वाहिनीची दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
.............
फोटोओळ – संघर्ष नगर चांदिवली येथे मलनिस्सारण वाहिनी फुटल्याने मलजल रस्त्यावर वाहून येत आहे.