Sanjay Raut: संजय राऊतांच्या अडचणीत वाढ! कोर्टाने बजावले अजामीनपात्र वॉरंट; नेमकं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 03:20 PM2023-01-06T15:20:49+5:302023-01-06T15:21:50+5:30
Sanjay Raut: संजय राऊतांविरोधात कोणत्या कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे? नेमके प्रकरण काय? जाणून घ्या...
Sanjay Raut:मुंबईतील पत्राचाळ कथित गैरव्यवहारप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना सुमारे १०० दिवसांनंतर जामीन मिळाला आणि ते कारागृहातून बाहेर आले. यानंतर संजय राऊत पुन्हा एकदा सक्रीय झाले. संजय राऊत हे शिंदे गट आणि भाजपवर सडकून टीका करताना पाहायला मिळत आहेत. मात्र, यातच आता संजय राऊत यांच्या अडचणीत वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईतील कोर्टाने संजय राऊतांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय राऊत यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. शिवडी कोर्टाने हे वॉरंट काढले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यासंदर्भात कोर्टाने ही सुनावणी घेतली. शिवडी कोर्टात येत्या २४ जानेवारी रोजी या प्रकरणी पुढील सुनवाणी होणार आहे.
संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा
किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा केलेला आहे. शिवडी दंडाधिकाऱ्यांच्या कोर्टासमोर यासंदर्भातला खटला सुरु आहे. संजय राऊत यांनी सामनातील अग्रलेखात सोमय्या यांच्याविरोधात शौचालय घोटाळ्याचा आरोप केला होता. १०० कोटींच्या या घोटाळ्याच्या आरोपामुळे आपली बदनामी झाली आहे, असा दावा मेधा सोमय्या यांनी केला होता.
दरम्यान, पत्राचाळ घोटाळा प्ररकणी संजय राऊतांचा ईडीमार्फतही तपास सुरु आहे. याच प्रकरणी १०० हून अधिक दिवस तुरुंगात राहिल्यानंतर संजय राऊत सध्या जामिनावर बाहेर आहेत. त्यांचा हा जामीन रद्द करण्यासाठी ईडीमार्फत आतापर्यंत चार वेळा खंडपीठासमोर याचिका दाखल करण्यात आली. मात्र जामीन रद्द झालेला नाही. न्यायाधीश नितीन बोरकर यांच्या खंडपीठासमोर ईडीने याचिका दाखल केली होती. मात्र न्यायाधीश बोरकर हे उपस्थित नसल्यामुळे यासंबंधीची याचिका पुढे ढकलण्यात आली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"