Sewri Nhava sheva Sea Link Bridge: दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहुचर्चित शिवडी न्हावा सी लिंक अटल सेतूचे उद्घाटन केले. देशाच्या पायाभूत सुविधांमध्ये मानाचा तुरा म्हणून या 21.8 किमी लांबीच्या सेतूकडे पाहिले जात आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने जाहीर केलेल्या आकड्यांनुसार शनिवारी, सुमारे 9,000 वाहने पुलावरुन गेली. शनिवारी हा पूल जनतेसाठी खुला केल्यानंतर अवघ्या काही तासांतच अनेक मुंबईकर नियमांची पायमल्ली करताना दिसले. सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यात अनेकजण पुलावर त्यांची वाहने थांबवून फोटो आणि सेल्फी घेताना दिसत आहेत.
प्रशासनाने पुलावरुन जाताना शंभर किमीची वेग मर्यादा सेट केली असूनही, लोक चक्क पुलावर वाहने थांबवून गर्दी करत आहेत. हा अटल सेतू जणू काय पिकनिक स्पॉट बनला आहे, असे दृष्ट पाहायला मिळत आहेत. दरम्यान, या गर्दीमुळे पुलावर कचरा आणि गुटखा खाऊन थुंकल्याचा प्रकारही समोर आळा आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणार्या पोस्ट्समध्ये हा सर्व प्रकार कैद झाला आहे.
मुंबई मॅटर्स नावाच्या ट्विटर पेजने या पुलवारचे अनेक फोटो शेअर केले आहेत, ज्यात अटल सेतू पिकनिक स्पॉटसारखे दिसतोय. दुसऱ्या काही फोटोंमध्ये रस्त्यावर थुंकल्याचे डाग दिसत आहेत. अशा बेजबाबदार वर्तनामुळे नेटकरी या लोकांवर झोड उठवत आहेत. तसेच, नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल मोठा दंड आकारण्याची विनंतीही करत आहेत.
एका यूजरने म्हटले की, सार्वजनिक पायाभूत सुविधांची देखभाल करणे, हे आपल्या सर्वांचे काम आहे. दुसर्याने म्हटले, सरकार फक्त पायाभूत सुविधा निर्माण करू शकते, त्याची निगा राखणे नागरिकांचे कर्तव्य आहे.तर, तिसऱ्याने म्हटले, समाज म्हणून आपण या सुविधांना पात्र नाही. एक समाज म्हणून लाज वाटते.