मुंबई : व्हॉट्सअॅप, टिकटॉक, बिंगो अॅपवरून सेक्स रॅकेट चालविणाऱ्या आरोपीला समाजसेवा शाखेने मंगळवारी अटक केली. आरोपींच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे. टोनी, गेहलोत, सूरज, राजकुमार आणि रवी मंडल हे सेक्स रॅकेट चालवित असल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांना मिळाली. त्यानुसार, समाजसेवा शाखेच्या पथकाने त्यांच्याशी संपर्क साधला असता, अंधेरी व जुहूतील हॉटेलमध्ये वेश्याव्यवसायासाठी पुरविण्यात येणाºया भारतीय मुलींकरिता ३५ ते ४० हजार तर पाश्चिमात्य मुलींकरिता १ ते ४ लाख इतके पैसे ते घेत असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार, मंगळवारी समाजसेवा शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक रेवले व पथक यांनी बनावट ग्राहकाच्या मदतीने टोनी, गेहलोतशी संपर्क साधला. झेड लक्झरी रेसिडेन्सीच्या खोली क्रमांक ३०४ येथे मुलींना आणण्यास सांगितले. ठरल्याप्रमाणे पथकाने तेथे छापा टाकून तीन मुलींची सुटका केली. तसेच दलाल गेहलोत, सूरजला पोलिसांनी ताब्यात घेतले. वेश्याव्यवसायासाठी वापरलेली कारही जप्त केली.
तपासात रवी मंडल हा वेश्याव्यवसायासाठी १० ते १५ मोटार कारचा वापर करीत असल्याचे समोर आले. त्यानुसार, जुहू पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात, सेक्स रॅकेट चालविणारा मुख्य सूत्रधार टोनी, राजकुमार, रवी यांना पाहिजे आरोपी म्हणून दर्शविण्यात आले आहे. ही मंडळी व्हॉट्सअॅप, टिकटॉक, बिंगो अॅपवरून ग्राहकांशी संपर्क साधत. मुलींप्रमाणे भाव सांगून महागड्या पंचतारांकित हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालवत असल्याचे तपासाअंती समोर आले आहे. त्यानुसार, या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.