- यशस्वी यादव
राजस्थान, हरयाणातील मेवात, भरतपूर, अलवार यासारख्या फार ज्ञात नसलेल्या गावांनी भारतात एक वेगळीच ‘क्रांती’ घडवलीय. शाळा सोडलेली उनाड पोरे, त्यांचे न शिकलेले पण धूर्त मालक यांनी जगातल्या अनेक देशांत सेक्स्टॉर्शनचे जाळे पसरवून लाखोंची माया जमवली आहे. पोलीस अधिकारी, राजकीय नेते, डॉक्टर्स, उद्योगपती त्यांची शिकार होत आहेत. देशात रोज सेक्स्टॉर्शनच्या ५०० हून अधिक घटना घडतात. त्यातून जेमतेम अर्धा टक्का घटनांमध्ये तक्रारी दाखल होतात. भारत सेक्स्टॉर्शनची जागतिक राजधानीच झाला आहे.
मुंबईतील एका आमदाराला सायबर क्रूक मोहम्मद खान याने आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान वापरून या जाळ्यात ओढले. गुन्हेगाराला राजस्थानात अटक झाली; पण त्याने ३०० हून अधिक लोकांना आधीच शिकार करून वीसेक लाख कमावले होते. राजस्थानचे मंत्री राम लाल जाट आणि भाजपा खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांना मागच्याच महिन्यात भरतपूरच्या रवीन खानने अश्लील व्हिडिओची धमकी दिली.
सर्वांत दुर्दैवी घटना मार्च २१ मध्ये बंगलोरला घडली. अशा धमक्यांनी बी.एस. अविनाश या व्यवस्थापनशास्त्र शिकणाऱ्या तरुणाने आत्महत्या केली. नेहा शर्मा या बनावट प्रोफाइलशी तो बोलत असे. तो ३६ हजार रुपये देऊन चुकला; पण मागणी होतच राहिल्याने त्याने आपले जीवन संपवले. गुजरातच्या एका माजी मंत्र्याने २.५ लाख दिले. ते बोलत होते हकीमुद्दीनशी. त्याच्या तीन नातलगांसह तो हा ‘कौटुंबिक उद्योग’ चालवत होता.
हे सेक्स्टॉर्शनिस्ट ४५ ते ६० वयोगटातील धनाढ्य लोक गाठतात. महिनोन्महिने टेहेळणी केली जाते. खऱ्या वाटतील अशा सुंदर स्त्रियांच्या प्रोफाइल्स करून समाज माध्यमांवर टाकल्या जातात. विवाहजुळणी संकेतस्थळेही वापरली जातात. या टोळ्यातल्या महिला सदस्यांना अश्लील बोलायला तयार केलेले असते. ज्याला जाळ्यात ओढायचे त्या व्यक्तीला बोलायला भाग पाडून रेकॉर्ड केले की खंडणी मागणे सुरू करता येते.
२००६ साली मुंबईच्या एका पत्रकार तरुणीला तिच्या स्टुडिओतील लॅपटॉपमध्ये फिशिंग करून पहिले बळी केले गेले. तिने आत्महत्येचा प्रयत्नही केला. मात्र, योग्य समुपदेशनामुळे ती या यातनांतून बाहेर आली. मारिया काप्रस ही फिलिपिनी महिला या उद्योगाची जागतिक महाराज्ञी. झोपडपट्टीतून ती मनिलाच्या महालात पोहोचली. १०,००० अमेरिकी डॉलर्स देऊनही डॅनियल पेरी या ब्रिटिश मुलाचा बळी तिच्यामुळे गेला. तिच्या महालात शंभरावर मुले अश्लील बोलून मुलींना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी कामाला ठेवली होती.
पेरीच्या मृत्यूने जग हादरले. मारिया पकडली गेली. तिच्याकडे १ महापद्म अमेरिकन डॉलर्सची संपत्ती आढळली. पेरीशी आर्की तोलीन हा मारियाने तयार केलेला फिलिपिनी मुलगा... तो मुलगी म्हणून बोलत असे. तो फरार झाला. मारियाही नंतर पोलिसांना लाच देऊन सुटली. २००६ ते २०२२ या काळात सेक्स्टॉर्शनचा उद्योग चार प्रकारे फोफावला. प्रेमिकेचे नग्न अवस्थेतील फोटो काढून नंतर धमकावणे, आवाजात बदल करून देणारी यंत्रे वापरून बनावट प्रोफाइल्स भक्ष्यावर सोडणे, तिसरा प्रकार म्हणजे म्हणजे सुंदर मुलींना प्रशिक्षण देऊन वापरणे आणि आता यातले काहीच न करता सरळ आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान वापरून हा उद्योग केला जातो. खंडणीची रक्कम बनावट खात्यात जमा केली जाते.
राणा अयुब या प्रसिद्ध पत्रकार महिलेला काही वर्षांपूर्वी सतत ऑनलाइन बलात्काराच्या धमक्या येत. कथुआतील एका मुलावर बलात्कार करणाऱ्यांचे भांडे अयुब यांनी फोडले होते; पण ते साहस त्यांना महागात पडले. उद्ध्वस्त मन:स्थितीत अयुब यांना त्यावेळी इस्पितळात दाखल करावे लागले होते. अनेक प्रसिद्ध अभिनेत्री, स्त्रिया आधुनिक तंत्रज्ञानाने विवस्त्र अवस्थेत दाखवता येऊ लागल्या... संबंधित ॲपवर बंदी आणण्याचा विचार आता महाराष्ट्र सायबर सेल करीत आहे. हे सेक्स्टॉर्शनिस्ट कितीही धूर्त असले तरी त्यांच्यासारख्या राक्षसांचा नि:पात करण्याची वेळ आता आली आहे. समाजाने त्यासाठी दृष्टी बदलली पाहिजे.