बोस्टनमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे सेक्सटॉर्शन! व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत उकळले पैसे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 03:10 PM2023-08-03T15:10:23+5:302023-08-03T15:10:51+5:30
मुंबई : अमेरिकेत शिकायला गेलेल्या एका २७ वर्षीय विद्यार्थ्याचे सेक्सटॉर्शन करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार वांद्रे परिसरात उघडकीस आला आहे. ...
मुंबई : अमेरिकेत शिकायला गेलेल्या एका २७ वर्षीय विद्यार्थ्याचे सेक्सटॉर्शन करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार वांद्रे परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी त्याच्या वडिलांनी खेरवाडी पोलिसांत धाव घेत खंडणी मागणाऱ्यांच्या विरोधात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करत तो पुढील तपासासाठी विलेपार्ले पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
तक्रारदार ६५ वर्षीय व्यक्ती असून, विलेपार्लेत त्यांचा कपड्याचा व्यवसाय आहे. त्यांचा पीडित मुलगा २०१८ पासून बोस्टन या ठिकाणी एमआयटी युनिव्हर्सिटीमध्ये फिजिक्स विषयाची पीएच.डी. करण्यासाठी गेला आहे. त्यामुळे त्याच्याकडे असलेल्या मोबाइल क्रमांकावर भारतात राहणारे त्याचे वडील आणि अन्य कुटुंबीय नियमित बोलत असतात. दरम्यान, ३० जुलै रोजी या विद्यार्थ्याने सकाळी १०:१२ च्या सुमारास वडिलांना फोन केला आणि दिलेल्या क्रमांकावर एक लाख रुपये जी पे करायला सांगितले.
इतक्या पैशाची गरज का आहे असे विचारल्यावर त्याचा होस्टेलचा मित्र ॲडमिट असून, या क्रमांकावर पैसे पाठविल्याशिवाय त्याला डिस्चार्ज देणार नाही असे उत्तर मुलाने दिले. त्यानुसार व्यावसायिकाने या क्रमांकावर एक लाख रुपये पाठवले आणि त्याचे स्क्रीनशॉटही मुलाला व्हॉट्सॲप केले. मात्र, रात्री ११ वाजता विद्यार्थ्याने वडिलांना फोन करत घडलेली हकीकत सांगितली.
खंडणी मागण्याचे सत्र सुरूच..
- या विद्यार्थ्याला १ ऑगस्ट रोजी एका मोबाइल नंबरवरुन पहाटे ३ च्या सुमारास फोन आला जो त्याने उचलला नाही.
- त्यानुसार या प्रकरणी खंडणीखोरांविरोधात भारतीय दंड संहिता कलम ३४, ३८४, ४१९, ४२० तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमचे कलम ६६ (सी), ६६ (डी) आणि ६७ (ए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, याचा तपास विलेपार्ले पोलिस करत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
मी तुझा आयआयटीचा मित्र !
पीडित मुलाला ३० जुलै रोजी एका मोबाइल नंबरवरुन व्हाॅट्सॲप कॉल आला आणि कॉलरने स्वतःला त्याचा आयआयटीमधील जुना मित्र असल्याचे सांगितले. त्यानंतर भारतात मेडिकल इमर्जन्सी असून पैशाची गरज आहे असेही म्हणाल्याने विद्यार्थ्याने त्याच्याकडे असलेले काही पैसे कॉलरच्या खात्यावर पाठवले. मात्र, पुन्हा त्याच क्रमांकावरून एक अश्लील व्हिडीओ त्याला पाठवण्यात आला. ज्यात हा विद्यार्थी अनोळखी महिलेसोबत विवस्त्र अवस्थेत दिसत होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देण्यात आल्याने विद्यार्थी घाबरला आणि कॉलरला पैसे देण्यास सुरुवात केली.