- गौरी टेंबकर-कलगुटकर, मुंबई
अल्पवयीन मुलाला टोळक्याने रस्त्यात एकटे गाठून, त्यातील एकाने त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना मालाडच्या कुरार परिसरात मंगळवारी रात्री घडली. या प्रकरणी एकाला कुरार पोलिसांनी अटक केली असली, तरी ‘मानेवर टॅटू’ असलेल्या मुख्य आरोपीचा शोध सध्या पोलीस घेत आहेत.कांदिवलीमध्ये बारा वर्षांचा राम (नावात बदल) हा पीडित मुलगा त्याच्या पालकांसोबत राहतो. घरची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसल्याने, तो शाळेत न जाता मालाडमध्ये एका मंदिरात साफसफाई करण्याचे काम करतो. त्यामुळे रोज रात्री दहाच्या सुमारास तो कांदिवलीतून कुरारमध्ये येतो आणि त्याचे काम करून परत जातो. मंगळवारीदेखील नेहमीप्रमाणे तो कुरारला येत असताना, पिंपरीपाडा परिसरात चार ते पाच जणांच्या एका टोळक्याने त्याला अडविले. रात्रीच्या वेळी याठिकाणी सामसूम असल्याने फारशी वर्दळ नसते. याचाच फायदा घेत, या टोळीच्या म्होरक्याने रामला स्वत:च्या गुप्तांगाशी अश्लील कृत्य करण्यास सांगितले, तेव्हा रामने त्याला नकार दिला. तेव्हा त्या नराधमाने त्याला शिवीगाळ करत मारहाण केली, तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. तेव्हा घाबरून रामने हे कृत्य केले. त्यानंतर, या प्रकराची वाच्यता कोठेही न करण्याची धमकी त्याने रामला दिली आणि घटनास्थळाहून पसार झाला.या प्रकारानंतर घाबरलेला राम घरी पोहोचला. मात्र, त्याने घडल्या प्रकाराबाबत त्याच्या पालकांना काहीच सांगितले नाही. त्याच्या वागण्याचा संशय येऊन त्याच्या घरच्यांनी त्याला विश्वासात घेत विचारले, तेव्हा रडतच सर्व हकिकत त्याने आई-वडिलांना सांगितली. त्यानुसार, त्यांनी कुरार पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकरणी तक्रार दाखल केली. याबाबत माहिती मिळताच, पोलिसांच्या एका पथकाने तातडीने घटनास्थळी दाखल होत, टोळक्याला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या ठिकाणी त्यांना कोणीच सापडले नाही.- पीडित मुलाकडे केलेल्या चौकशीत आरोपीच्या मानेवर टॅटू होता, असे समोर आले आहे. मानेवर टॅटू असणाऱ्या अभिलेखावरील सर्व आरोपींचे रेकॉर्ड आम्ही तपासून पाहिले, तसेच पीडित मुलालाही दाखविले. त्याने एकाला ओळखले असून, त्याचा एक मित्र सागर राय (२१) याला अटक करण्यात आली आहे. - तो अभिलेखावरील गुन्हेगार असून, त्याच्यावर मारामारी आणि चोरीसारखे गुन्हे दाखल आहेत, तसेच मंगळवारी रात्री तो घटनास्थळी होता. त्यानुसार, त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून, मुख्य आरोपीचा शोध आम्ही घेत आहोत, असे पोलिसांनी सांगितले.