Join us

मॉडेलिंग करणाऱ्या तरुणावर ठाण्यात लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 4:16 AM

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : गुजरात राज्यात मॉडेलिंग करणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणावर ठाण्यातील एका बंद कंपनीच्या गच्चीवर चौघांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : गुजरात राज्यात मॉडेलिंग करणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणावर ठाण्यातील एका बंद कंपनीच्या गच्चीवर चौघांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलिसांनी सोमवारी पुनीत शुक्ला (२६) याला तर मंगळवारी रात्री रवी जयस्वाल (२३) आणि अरविंद प्रजापती (२३) अशा तिघांना अटक केली. त्यांच्या चौथ्या साथीदाराचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या पीडित मॉडेल तरुणाचे काही नातेवाईक ठाण्यातील सावरकरनगर भागात वास्तव्याला आहेत. त्यांनाच भेटण्यासाठी तो ठाण्यात आला होता. ही माहिती त्याचा फेसबुकवरील मित्र पुनीत याला मिळाली. त्याने ३ जानेवारी रोजी रात्री पीडित तरुणाला भेटण्यासाठी साठेनगर येथील बंद पडलेल्या एका कंपनीजवळ बोलविले. तो तिथे आल्यानंतर गप्पा मारण्याच्या बहाण्याने त्याला या कंपनीच्या गच्चीवर नेले.

त्या ठिकाणी काही वेळातच आणखी दोघे जण आले. त्यांनी या तरुणाला बांबूने मारहाण करून नंतर त्याच्यावर इतर तिघांनी अनैसर्गिक सामूहिक अत्याचार केला. हा सर्व प्रकार पुनीतने आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड करून मारहाण केली. नंतर त्याच्याजवळील मोबाइल फोन आणि सहा हजारांची रोकड जबरीने हिसकावली. पोलिसांकडे तक्रार केल्यास हा व्हिडीओ फेसबुकवर टाकण्याची धमकी देऊन चौघेही तिथून पसार झाले. या प्रकाराने भेदरलेल्या या तरुणाने दुसऱ्या दिवशी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. चार जणांविरुद्ध अनैसर्गिक सामूहिक अत्याचार, मारहाण करून जबरीने चोरी केल्याचा गुन्हा दाखल झाला.

*वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निकुंभ आणि पोलीस हवालदार शिवाजी रावते यांच्या पथकाने सोमवारी पुनीतला श्रीनगर परिसरातून अटक केली. त्यापाठोपाठ त्याच्या दोन्ही साथीदारांना मंगळवारी अटक केली. पुनीतला ११ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. आरोपींचे मोबाइल फोन तपासणीसाठी जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.