मुंबई - बदलापूरात २ अल्पवयीन मुलींच्या छळाचा विषय मनसेकडून लावून धरल्यानंतर हे प्रकरण राज्यभरात चर्चेत आले. त्यानंतर यात आरोपीला अटक झाली. आता मुंबईतील प्रसिद्ध नायर हॉस्पिटल मेडिकल कॉलेजमधील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या ठिकाणच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी मनसेकडे धाव घेतली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांची विद्यार्थ्यांनी भेट घेतली. या भेटीत कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर सुरू असलेल्या छळाची माहिती दिली. हे विद्यार्थी प्रचंड दहशतीखाली असल्याचंही संदीप देशपांडे यांनी सांगितले.
या प्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत महापालिका प्रशासनावर गंभीर आरोप केले. संदीप देशपांडे म्हणाले की, नायरमधील बरेच विद्यार्थी, विद्यार्थिनी आम्हाला भेटले. महाविद्यालयात कशारितीने लैंगिक छळ सुरू आहे हे त्यांनी सांगितले. हे विद्यार्थी प्रचंड घाबरलेले आहेत. वारंवार तक्रार करूनही महापालिका प्रशासन दखल घेत नाही. महिलांच्या अंतर्गत समितीकडे एक जण दोषी आढळला. त्याला निलंबित करण्यात आले मात्र निलंबनानंतरही त्याला कॉलेजने बाहेर ठेवले नाही. महापालिकेने त्यांच्या अधिकारात मानवतावादी दृष्टीकोनातून त्या निलंबित व्यक्तीला कॉलेजच्या कॅम्पेसमध्ये राहण्यासाठी घर दिले. जो विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करतो त्याच्याबद्दल महापालिका प्रशासन कसला मानवतावादी दृष्टीकोन ठेवते? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच हे सर्व प्रकरण ऑन रेकॉर्ड आहे. मुलींबद्दल माणुसकी नाही का? जर आमच्याबद्दल तक्रार केली तर आम्ही तुमच्यावर अट्रोसिटी टाकू, सुप्रीम कोर्टापर्यंत खेचू, जेलमध्ये टाकू असं धमकावलं जाते. एक विद्यार्थिनी पोलीस स्टेशनला तक्रार करायला गेली तेव्हा पुरुष पोलीस अधिकारी अत्यंत वाईट भाषेत मुलींशी बोलला असं या मुलींनी मनसेला सांगितले. मुली दहशतीखाली आहेत. आम्ही त्यांना तुमच्यासोबत आहोत, तुम्ही सोबत चला असं जेव्हा मी म्हटलं तेव्हा त्या मुली म्हणाल्या की, आमचं आयुष्य बर्बाद करू अशा धमक्या त्यांना दिल्या आहेत. मुंबई महापालिकेचे आयुक्त जे कुटुंबप्रमुख आहेत तेदेखील या विद्यार्थिनींना भेटत नाहीत. दोनदा आयुक्तांना भेटायला गेले तरीही भेट दिली नाही ही तुमची संवेदनशीलता आहे का, लाडकी बहीण योजना काढायची आणि बहिणीवरील अशी प्रकरणे दाबण्याचा प्रयत्न करायचा असा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला.
दरम्यान, जेव्हा प्रकरण घडते, तेव्हा वेळीच रोखले पाहिजे त्यानंतर आरोपीचा एन्काउंटर करून काय साध्य करणार आहोत असं सवाल देशपांडेनी विचारला आहे. आमच्या बहिणी सुरक्षित नसतील तर या गोष्टी करण्याचा उपयोग काय, गुलाबी रंगाचे फेटे घालून काही होणार नाही. मुलींना सुरक्षा द्यावी लागेल. पोलीस, महापालिका प्रशासनाने एका संवेदनशील उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्याची नेमणूक करून या नायर प्रकरणाची चौकशी करावी. विद्यार्थी, विद्यार्थिनींना विश्वासात घ्यावे लागेल. भविष्यात त्यांना काही होणार नाही अशी ग्वाही द्यावी लागेल. नायरचे प्रकरण अत्यंत धक्कादायक आहे. मनसे १०० टक्के या मुलांच्या पाठिशी आहेत. अन्याय सहन न करता समोर येऊन तक्रार करावी आम्ही खंबीरपणे या मुलांच्या पाठिशी आहोत असं आवाहन मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केले आहे.