बॉम्बे आयआयटीमध्ये विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 04:38 AM2018-06-20T04:38:13+5:302018-06-20T04:38:13+5:30
आयआयटी बॉम्बेमध्ये शेवटच्या वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप होत असून, फेसबुकवर आयआयटी बॉम्बेच्या कन्फेशन पेजवरून काही विद्यार्थ्यांनी आपल्यावर झालेल्या त्रासाला वाचा फोडली आहे.
मुंबई : आयआयटी बॉम्बेमध्ये शेवटच्या वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप होत असून, फेसबुकवर आयआयटी बॉम्बेच्या कन्फेशन पेजवरून काही विद्यार्थ्यांनी आपल्यावर झालेल्या त्रासाला वाचा फोडली आहे. विशेष म्हणजे, काही तरुणांनीही आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा दावा केला आहे.
आरोपी विद्यार्थी इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षाला शिकत असून, आयआयटी बॉम्बेच्या शिस्तपालन समितीकडे ज्युनिअर्सनी लैंगिक छळ झाल्याबाबत तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्यावर कारवाई झाली नसल्याचे फेसबुकवर विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. यामुळेच पीडित विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर आवाज उठविला असून, आरोपी विद्यार्थ्यांवर कारवाई न झाल्यास, पदवी प्रदान समारंभाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही विद्यार्थ्यांनी दिला आहे.
या प्रकरणानंतर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने या विरोधात आवाज उठविला आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँगेसचे मुंबई अध्यक्ष अमोल मातेले यांनी मंगळवारी आयआयटी प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन करून, मुखर्जी यांच्या विरोधत घोषणा दिल्या व राजीनामा मागितला.
पोलिसांनी तातडीने लक्ष घालून योग्य ती कायदेशीर करवाई करावी, यासाठी मातेले यांनी सहायक
पोलीस आयुक्त मिलिंद खेतले
यांना पत्र देऊन चर्चा केली. कारवाई
न झाल्यास आंदोलन तीव्र करावे लागेल, असा इशाराही मातेले यांनी दिला.